मुंबईः अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला असून त्याप्रमाणे युद्धपातळीवर काम करण्यात यावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहे. त्याप्रमाणे, भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी करण्यात आली असून महावितरण भांडूप परिमंडलचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करण्यासाठी सज्ज आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘तौक्ते’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे वेगवान वादळासह मुसळधार पाऊस भांडूप परिमंडलातील ठाणे, वाशीसह पेण मंडळातील रायगड जिल्ह्याला तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुख्य अभियंता यांनी तीनही मंडळतील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच इतर अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक घेऊन त्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या.

सध्या करोना प्रादुर्भावामुळे सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणने कर्मचाऱ्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जाहीर केला असून वीजपुरवठा खंडित होऊ नये तसेच स्थानिक पातळीवर वीजयंत्रणेचे कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे. सोबतच आवश्यक यंत्रसामग्रीचा साठा करून ठेवण्यात आला आहेत. यामध्ये विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईल व इतर तांत्रिक साहित्याचा समावेश आहे. यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व एजन्सीसना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

नैसर्गिक आपत्तीमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. सोबतच यंत्रणा दुरुस्तीचे काम देखील युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. सध्या करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रामुख्याने मोठे व कोविड रुग्णालये, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाशी समन्वय ठेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश महावितरणच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे ज्या भागात पाणी साचेल किंवा वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. तरी, सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येते की मोबाईल, लॅपटॉप व इतर आवश्यक यंत्रणा चार्ज करुन ठेवावेत तसेच आवश्यक पाणीसाठा करुन ठेवावा.

या चक्रीवादळाबाबत माहिती देण्यासाठी मंडलस्तरीय दैनंदिन सनियंत्रण कक्षाकडून वीजपुरवठ्याबाबत माहिती, वीजयंत्रणेचे नुकसान तसेच इतर आवश्यक माहिती मुख्यालयातील कक्षाला पाठवण्यात येणार आहे. तसेच वीजयंत्रणेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यास वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्यासाठी इतर ठिकाणीहून अभियंते व कर्मचारी संबंधीत दुरुस्ती कामासाठी पाठविण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here