‘आपण सगळेजण पाहतोय की, करोनामध्ये मंदिरेही बंद आहेत.. देव पण लॉक करण्यात आले आहेत.. तुम्हाला वाचवायला कुणी येणार नाही…स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी लागेल…म्हणून हे उपास-तापास बंद करा…रोज ४ अंडे खा…एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटीनयुक्त भरपूर आहार खा..’, असा सल्ला आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्याचा भाजप आणि वारकरी संप्रदायातील एका गटातून विरोध करण्यात आला होता.
करोनाच्या नावाने हिंदू सनातन धर्मीयांना मांसाहाराकडे वळवण्याचा बुलडाण्याचे आमदार गायकवाड यांचा प्रयत्न असून त्यांनी एका वृत्तपत्रात बेताल असं वक्तव्य केलं असल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला होता. या वक्तव्यावर बुलडाणा जिल्ह्यातून आणि राज्यभरातूनही आक्षेप घेतला गेला. या प्रकरणात काही वारकऱ्यांनी उडी घेत आमदार गायकवाड यांना फोन करून जाब विचारला व यातून वाद निर्माण होऊन त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली.
याप्रकरणी प्रशांत महाराजांनी आमदार गायकवाड यांची त्यांच्या बुलडाण्याच्या कार्यालयावर येऊन भेट घेत चर्चा केली आणि या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून राजकारण होत असल्याने आता या विषयाला वारकऱ्यांनी इथेच थांबवावे, असं आवाहन सुद्धा केले होते.
दरम्यान, आज संजय गायकवाड यांनी कोविड रुग्णांना व नातेवाईकांना चिकन-अंडी देऊन आपण आपल्या मतावर ठाम आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृतीवर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहावं लागेल.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times