कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावर टीका करतात. पवारांनीही चंद्रकांत पाटलांना चांगलाच खोचक टोला लगावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या ‘राष्ट्रीय’ नेत्यावर आपण काय बोलावं, असा टोला पवारांनी लगावला. चिठ्ठ्या वाटल्याबाबत खरं काय आणि खोटं काय माहित नाही. पण वर्तमानपत्रात वाचलं होतं, असंही सांगायला पवार विसरले नाहीत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षासोबत भाजपला हरवण्यासाठी हातमिळवणी केली होती.’ शिवाय ‘आप’ला मिळालेल्या यशात शरद पवारांचं काहीही योगदान नाही, त्यामुळे त्यांनी त्याचा टेंभा मिरवू नये, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिला होता.

लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा, चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे आता आपल्याला शरद पवारांवर पीएचडी करायची असल्याचं ते म्हणाले होते. ‘गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात असूनही पवारांना १० च्या वर खासदार निवडून आणता आले नाही. पण तरीही ते राजकारणात केंद्रबिंदू कसे काय असतात?’ असा सवाल करत त्यांच्यावर पीएचडी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

दिल्लीच्या निकालावर पवार काय म्हणाले
?

‘दिल्ली हे देशातील इतर शहरांपेक्षा वेगळं शहर आहे. तिथं अनेक राज्यांतील लोक आहेत. त्यामुळं दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा त्या राज्यापुरता मर्यादित नाही. बदलाचं वातावरण देशभरात आहे. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे आणि ती आता थांबणार नाही,’ असा ठाम दावा शरद पवार यांनी केला.

शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निकालाचं विश्लेषण केलं होतं. मोदी-शहांच्या राजकारणावर त्यांनी सडकून टीका केली. ‘दिल्लीच्या निवडणुकीचा अंदाज मी दिल्लीत असताना घेतला होता. माझ्या तिथल्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांशी बोललो होतो. मराठी भाषिक लोक राहत असलेल्या करोल बागमध्येही मी कानोसा घेतला होता. सगळे केजरीवालांचं नाव घेत होते. मागील वेळी भाजपला मत देऊन फसल्याची त्यांची भावना होती. याउलट केजरीवालांनी त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं दिल्लीच्या निकालाचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. भाजपचा पराभव होणारच होता,’ असं पवार म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here