मुंबई : करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राची स्थिती हळूहळू सुधारत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज रुग्ण बरे होणाऱ्या संख्येत वाढ झाली आहे. आज ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर राज्यात आज करोनाच्या ३४ हजार ३८९ नवीन रुग्णाांचे निदान झाले आहे.

महाराष्ट्रावरील करोनाचं संकट अद्याप दूर झालेलं नसली तरीही दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या रुग्णसंख्येने काहीसा दिलासा मिळत आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आज रविवारी कोल्हापूर ८१, सोलापूर ७८, नागपूर ७३, मुंबई इथं ६० करोना बाधितांचा मृत्यू झाला. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानी याबाबत माहिती दिली आहे.

तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका; राज्यात बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सची स्थापना
ऑनलाईन वैद्यकीय परिषदेत बोलताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची तिसरी लाट आणि राज्य सरकारची तयारी याबाबत माहिती दिली आहे. उपचार पद्धतीत नेमकेपणा आवश्यक असतो, त्यासाठी दिशा दाखवण्याचे काम राज्य टास्कफोर्सचे सदस्य करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना करोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे, बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स आपण स्थापन केला आहे. आजच्या प्रमाणे येत्या काही दिवसात राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांना या टास्कफोर्सचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, आपण हा कार्यक्रम आयोजित करू.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील सर्व डॉक्टर जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता सैनिकांप्रमाणे रुग्णांचा जीव वाचवण्याचे काम करत असल्याचे म्हटले. डॉक्टरांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न याची आपल्याला जाणीव असून शासन तुमच्यासोबत आहे, तुमच्या अडचणी प्राधान्याने सोडवल्या जातील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी डॉक्टरांना दिला. राज्यातील लसीकरणाची स्थिती, लसींची उपलब्धता याबाबतची स्पष्टताही मुख्यमंत्र्यांनी केली. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आज बंद आहेत. मग आपल्याला देव कुठे दिसतो तर तो तुमच्या रुपात दिसतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी तुम्हा देवदुतांच्या मदतीने आपण कोविडविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास ही व्यक्त केला. त्यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचे, तज्ज्ञांचे आभारही मानले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here