: चक्रीवादळामुळे मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याची माहितीही देण्यात आली आहे. तौक्ते चक्रीवादळ हे आता मुंबईच्या अगदी जवळ असल्यामुळे समुद्रही खवळला आहे. याचाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला आहे.
हा व्हिडिओ गेट वे ऑफ इंडिया या परिसरातला आहे. समुद्र खवळला असून मोठ्या लाटा समुद्रात उसळल्या आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरात लावलेले बॅरिगेट्सही पडले आहेत. तर अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे या चक्रीवादळाने रौद्ररुप धारण केलं आहे.
दरम्यान, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत मध्यरात्रीपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई ऑरेंज अलर्ट
तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अॅलर्ट व तर, रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
सोमवारी तौक्ते चक्रीवादळाचा रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला समांतर समुद्रातून प्रवास होणार असून, वादळाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासनातर्फे या पट्ट्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला रेड अॅलर्ट जारी केल्यामुळं जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी आज व उद्या घरातच राहावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. समुद्र किनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत रस्त्याच्या कडेला वा वस्तीत धोकादायक स्थितीत होर्डिंग असल्यास ते हटवण्याची सूचनाही संबंधितांना देण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times