अमरावतीः जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. करोना रुग्णांच्या जिवाशी खेळून औषधांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते यांनी केली आहे. फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना याबाबतचे पत्रही लिहिले आहे.

अमरावतीच्या रेमडेसिव्हिर घोटाळ्यातील खरा आरोपी कोण याचा तपास लागावा अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांची असताना. स्थानिक भाजपा नेत्यांनी याच दिशेने आपला पाठपुरावा सुरु केला आहे. आता राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे मागणी केल्यानंतर या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमरावती शहरात नुकतेच रेमडेसिव्हिरच्या काळा बाजाराचे एक रॅकेट पकडण्यात आले. यातील ५ व्यक्ती हे शासकीय रूग्णालयांमध्ये काम करणारे आहेत, तर त्यापैकी २ तर थेट अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी अशा वरिष्ठ पदांवर काम करणारे आहेत. थेट वैद्यकीय अधिकारीच या प्रकरणात गुंतले असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. असे असताना त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची साधी पोलीस कोठडी सुद्धा मागितली जाऊ नये, हे अतिशय गंभीर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुळातचरेमडेसिव्हीरचा पुरवठा हा जिल्हाधिका-यांमार्फत थेट रुग्णालयांना केला जातो. त्यामुळे कुठलीही खासगी व्यक्ती रेमडेसिव्हिर वितरित करू शकत नाही. असे असताना शासकीय यंत्रणेतूनच हे काळाबाजारीचे रॅकेट चालत असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे नितांत गरजेचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

या संकटाच्या काळात अनेक रुग्ण औषधाविना तडफडत आहेत. अशातच औषधांचा काळाबाजार घातक आहे. अमरावती जिल्ह्यातून या प्रकरणाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यातून एकूणच स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे आपण याबाबत अधिक लक्ष घालून कठोरातील कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here