मुंबई: राज्यातील बाधित रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असून गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. तसेच दररोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये देखील घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २६ हजार ६१६ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ३४ हजार ३८९ इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून असून हा फरक ७ हजार ७७३ इतका आहे.

तर दुसरीकडे निदान होणाऱ्या नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. ही दिलासादायक बाब आहे. आज एकूण ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५९ हजार ३१८ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील खाली घसरली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ४५ हजार ४९५ वर आली आहे. ( maharashtra registered 26616 new cases in a day with 48211 patients recovered and 516 deaths today)

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

आज राज्यात एकूण ५१६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ९७४ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४८ लाख ७४ हजार ५८२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या घटली

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती ४ लाख ४५ हजार ४९५ वर घसरली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यातही सक्रिय रुग्णसंख्या घटत असून आज येथे एकूण ७६ हजार १६० इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ३२ हजार ७६१ वर आला आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या २८ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २९ हजार ४२८ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार ४०१ इतकी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here