मुंबई : सोमवारी मुंबईनंतर आता तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकलं आहे. पण असं असलं तरी या वादळाचा धोका कायम असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाची तीव्रता ही कमी झाली आहे. पण मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसेच ताशी १२० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. खरंतर, कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांचं, घरांचं आणि गाड्यांचं नुकसान झालं आहे.

सोमवारी तौत्के चक्रीवादळाचं रौद्र रूप मुंबईने पाहिलं. संपूर्ण दिवसभर मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याचवेळी पावसानेही मुंबईला झोडपले. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेने १८९ मिलीमीटर पावसाची नोंद केली तर सांताक्रूझ वेधशाळेने १९४ मि.मी. पावसाची नोंद केली. पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर मुंबई शहरात १०५.४४, पूर्व उपनगरात ६१.१३ तर पश्चिम उपनगरात ११४.७८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.

मुंबईत महालक्ष्मी जंक्शन, हिंदमाता, नाना चौक, सक्कर पंचायत चौक वडाळा, दादर टीटी, एसआयईएस महाविद्यालय सायन, बिंदुमाधव ठाकरे जंक्शन वरळी, पठ्ठे बापुराव मार्ग ग्रँटरोड, चंदन स्ट्रीज मशीद बंदर रोड, चिराबाजार, शंकर बारी लेन, ५६ मोदी स्ट्रीट कुलाबा, जेजे रोड जंक्शन, बीडीडी चाळ अमृतवार मार्ग वरळी, अंधेरी सबवे, ओशिवरा बस डेपो, साईनाथ सबवे, लोखंडवाला लेन अंधेरी, मालवणी गेट नं. ६, योगीनगर बोरीवली, यशवंत नगर वाकोला या ठिकाणी पाणी भरले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here