अधिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे वसई-विरार आणि नालासोपाऱ्यामधील अनेक सखोल भागांमध्ये पाणी साचलं होतं. अद्यापही काही शहरांमधलं पाणी ओरलं नसून सकाळपासून मुसळधार पाऊस शहरात सुरू आहे. वाऱ्याचा वेगही जास्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घरीच राहून आपली काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
दरम्यान, चक्रीवादळामुळे नालासोपाऱ्यात एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येत आहे. अंगावर झाड पडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आजही पावसाचा तडाखा असाच असणाऱ आहे. त्यामुळे महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा घरीच सुरक्षित राहा असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसेच ताशी १२० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. खरंतर, कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांचं, घरांचं आणि गाड्यांचं नुकसान झालं आहे.
सोमवारी तौत्के चक्रीवादळाचं रौद्र रूप मुंबईने पाहिलं. संपूर्ण दिवसभर मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याचवेळी पावसानेही मुंबईला झोडपले. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेने १८९ मिलीमीटर पावसाची नोंद केली तर सांताक्रूझ वेधशाळेने १९४ मि.मी. पावसाची नोंद केली. पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर मुंबई शहरात १०५.४४, पूर्व उपनगरात ६१.१३ तर पश्चिम उपनगरात ११४.७८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times