यवतमाळ : ‘म्युकरमायकोसिस’ने यवतमाळमध्येही शिकराव केला असून या आजाराने एका ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर आणखी ११ रूग्णांना म्युकरमायकोसिसने ग्रासले आहे. त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण असून याचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

अधिक माहितीनुसार, शुक्रवारी १४ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय प्रशासनाने आज सोमवारी त्याबाबत अधिकृत माहिती दिली. राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे दीड हजारांवर रूग्ण आढळून आले आहेत. यवतमाळातही म्युकरमायकोसिसचे ग्रामीण व शहरी भागात किमान ११ रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दुजोरा दिला. एका ६० वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला तर अन्य रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एका रूग्णास उपचारानंतर सुट्टी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात म्युकरमायकोसिसग्रस्त सात रुग्णांची नोंद झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार रूग्ण आढळले तर खागसी दवखान्यांमध्येही रूग्ण असल्याचे डॉ. भुयार यांनी सांगितले. वणी विभागात झरी तालुक्यातील बोपापूर भागात ६५ वर्षीय पुरूष या आजराने ग्रस्त आहे. त्याला वणी येथे ट्रामा केअर सेंटरमध्ये करोनाचे निदान झाल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. प्रकृती ठिक झाल्यानंतर ९ मे रोजी सुटी देण्यात आली होती. मात्र घरी गेल्यानंतर त्याला त्रास वाढल्याने १५ मे रोजी त्याला पुन्हा वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला म्युकरमायकोसिस आजाराची सुरुवात असल्याचे निदान झाल्याने यवतमाळ येथे दाखल करण्यात आले. या आजाराविरूद्ध लढण्यासाठी वैद्यकीय प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये १५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या रूग्णांनाम्युकरमायकोसिस आजाराची लागण होते. कोविड पश्चात हा आजार अनेक रूग्णांमध्ये बळावत आहे. हा एक प्रकारचा फंगस असून तो पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र, करोना उपचारात मधुमेह, स्टीरॉईडचा अति वापर या कारणांनी रूग्णाची प्रतिकरशक्ती कमी होत असल्याने हा फंगस क्रियाशील होत असल्याचे डॉ. सुरेंद्र भुयार यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here