नवी दिल्लीः देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने स्थिती बिकट असताना आता त्यावरून राजकारणही रंगले आहे. केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान टूलकीटच्या कटच्या कटाचा पर्दाफाश झाला होता. करोना काळात आता असेच टूलकीट ( ) इंटरनेटवर व्हायरल होत आहे. राजकीय फायद्यासाठी काँग्रेसने ( ) हे टूलकीट तयार केले आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेवर हल्लाबोल करा, असे निर्देश टूलकीटमधून देण्यात आले आहेत. त्याच धरतीवर काँग्रेस नेते राहुल गांधीसह काही नेते सतत पंतप्रधान मोदींवर वैयक्तीक पातळीवर हल्ले करत आहेत. प्रत्येक काँग्रेस नेता करोनाच्या नवीन व्हेरियंटला मोदी व्हेरियंट सारख्या शब्दांचा उपयोग करत आहेत. विदेशी माध्यमांना जळत्या मृतदेहांचे फोटो देत आहेत. सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसचा निषेध केला आहे. काँग्रेस समाजात फूट पाडण्याचा आणि विष कालवण्यात माहीर आहे. करोनाच्या संकटाच्या काळातही काँग्रेसची ही सवय गेली नाही. पण काँग्रेसने टूलकीटच्या मॉडेलपासून बाहेर येऊन काही सकारात्मक काम करावं, असं नड्डा म्हणाले.

कथित टूलकीटमध्ये विविध विषयांवर निर्देश देण्यात आले आहेत. यातील एक विषय हा पंतप्रधान मोदींची प्रतिमा. पंतप्रधान मोदींची प्रतिमा अजूनही चांगली आहे. यामुळेच त्यांच्या प्रतिमा उद्ध्वस्त करावी लागेल. यासाठी पंतप्रधान मोदींना कठड्यात उभं करून त्यांच्यावर सोशल मीडियातून प्रश्न विचारले जावेत. हे सर्व काँग्रेस नेते करत आहेत, असं भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले.

टूलकीटमध्ये अमित शहा बेपत्ता, जयशंकर क्वारंटाइन, राजनाथ सिंह साइडलाइन, इन्सेन्सेटिव्ह निर्मला, अशा शब्दांता उपयोग करण्याचा आणि वेळोवेळी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे हे टूलकीट आणि काँग्रेस नेत्यांचे गेल्या काही दिवसांपासूनचे वर्तन पाहता काँग्रेस पक्ष गलिच्छ राजकारण करू इच्छित आहे. गेल्या काही दिवासांपूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी, गुलाम नवी आझाद यासारख्या नेत्यांकडून पत्र लिहिण्यात आलं. हे सर्व नेते टूलकीटमधील हेच शब्द वापरत आहेत, असा आरोप पात्रांनी केला.

टूलकीट बोगस, काँग्रेसचा दावा

इंटरनेटवरील काँग्रेसच्या कथित टूलकीटचं प्रकरण पोलिस ठाण्यात गेलं आहे. भाजपचे दावे निराधार असून पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह इतर नेत्यांविरोधात पोलिस तक्रार करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. दिल्ली पोलिसांनी आपली तक्रार नोंदवली नाही तर पक्षा कोर्टात धाव घेईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. कथित टूलकीट प्रकरणी भाजप नेत्यांचे वक्तव्य आणि सोशल मीडियातील पोस्टच्या प्रतींसह काँग्रेसने दिल्ली पोलिसात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here