सोमवारी सकाळी ८.३० वाजता ‘तौक्ते’चे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाल्याचे जाहीर करण्यात आले. मुंबईला सोमवारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मुंबईमध्ये मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल, असे पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवले होते. मात्र सोमवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर तसेच चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यानंतर मुंबई, ठाणे तसेच पालघर परिसरामध्ये अतितीव्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला. तोपर्यंत मुंबईला पावसाचा तडाखा बसायला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेकांनी ‘झूम अर्थ’, ‘विंडी डॉट कॉम’ यांच्या मदतीने चक्रीवादळ नेमके कुठे आहे याचा अंदाज घेत असल्याचे सांगितले.
भारतीय हवामान विभागाचे मुंबईतील रडार बंद असल्याने चक्रीवादळ, पाऊस, ढग याचा अंदाज घेता येत नव्हता. यासंदर्भात वारंवार प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करूनही त्यांनी उत्तर देणे टाळले. भारतीय हवामान विभागाने गेल्या वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मार्ग आणि ते कुठे धडकणार याबद्दलचा अंदाजही चुकवल्याने अनेकांनी भारतीय हवामान विभागाच्या अंदाज आणि पूर्वानुमानावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले. चक्रीवादळाचा प्रवास सुरू असताना, रडार नादुरुस्त असेल तर ते का दुरुस्त होऊ शकत नाही? अशी विचारणाही करण्यात आली. इतर सर्व माहिती सातत्याने ऑनलाइन देण्यासाठी धडपडणाऱ्या भारतीय हवामान विभागाकडून रडार नादुरुस्त असल्याबद्दल जाहीर माहिती का दिली जाऊ शकत नाही अशी टीकाही यानिमित्ताने करण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाकडून रात्री ८.३०च्या बातमीपत्रात या चक्रीवादळाची तीव्रता १७, म्हणजे सोमवारी रात्रीपासून कमी व्हायला सुरुवात होईल असे नमूद करण्यात आले. १७ मे रोजी रात्री अतितीव्र चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात आणि मंगळवारी त्याची तीव्रता आणखी कमी होऊन १८ मे रोजी सकाळी ५.३० वाजता ते तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times