पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या आजाराच्या ‘लेप्टोस्पायरा'(स्पायराकिट्स) हे सूक्ष्मजंतू असू शकतात. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी या प्राण्यांच्या लघवीद्वारे लेप्टोचे सूक्ष्म जंतू पावसाच्या पाण्यात संसर्गित होतात. त्या पाण्याचा माणसाशी संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले असले तरी अशा छोट्याशा जखमेतूनही लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे डॉ. गोमारे म्हणाल्या.
आजाराचे स्वरूप
-ज्या व्यक्ती पावसाच्या साचलेल्या पाण्यातून एकदाच चालल्या असून, ज्यांच्या पायावर किंवा शरीराच्या भागावर जखम नसेल त्या ‘कमी जोखीम’या गटात मोडतात. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ‘डॉक्सिसायक्लीन'(२०० मिलीग्रॅम) या गोळीचे एकदा सेवन करावे
-ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम होती, अशा व्यक्ती ‘मध्यम जोखीम’या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर ‘डॉक्सिसायक्लीन'(२०० मिलीग्रॅम) दररोज एक वेळा याप्रमाणे सलग तीन दिवस सेवन करावे.
√-ज्या व्यक्ती पावसाच्या साचलेल्या पाण्यातून एका पेक्षा अधिक वेळा चालल्या किंवा ज्यांनी साचलेल्या पाण्यात काम केले आहे, अशा व्यक्ती ‘अतिजोखीम’या गटात मोडतात. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ‘डॉक्सिसायक्लीन'(२०० मिलीग्रॅम) आठवड्यातून एक वेळा याप्रमाणे सलग सहा आठवडे सेवन करायला सांगायचे आहे. गर्भवती स्त्रिया व ८ वर्षांखालील बालकांना डॉक्सिसायक्लीन देऊ नये.
महत्त्वाचे काही…
– √एका व्यक्तीकडून दुसऱ्यास लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.
– पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यु, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– √पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.
– √साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावेत.
– डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘लेप्टोस्पायरोसिस’ प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.
– ✓लेप्टोस्पायरोसिस हा गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. वेळीच प्रतिबंधात्मक औषध उपचार करणे गरजेचे आहे.
– ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
– पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा.
– उंदीर-घुशींचा नायनाट करावा. उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे.
√- घरात व आजुबाजूला कचरा साठणार नाही, याची दक्षता घ्यावी व कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावावी.
– पाळीव प्राण्यांचे लेप्टो प्रतिबंधात्मक लसीकरण व इतर आवश्यक ते लसीकरण पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वेळच्या-वेळी व नियमित करवून घ्यावे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times