म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुंबई महापालिकेने एक कोटी लशींच्या खरेदीसाठी मागवलेल्या जागतिक निविदेला मंगळवारी अखेरच्या दिवसांपर्यंत एकाही कंपनीने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पालिकेने आणखी सात दिवस म्हणजे २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लसखरेदी लांबणीवर पडणार हे स्पष्ट दिसते आहे.

करोना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने लसीकरण वेगवान करण्याचे ठरवले असून, एक कोटी लसमात्रा खरेदी करण्यासाठी १२ मे रोजी जागतिक निविदा अर्ज मागवले होते. निविदा प्रक्रियेत भाग घेणाऱ्या कंपन्याच्या शंका आणि सूचना १६ मेपर्यंत, तसेच त्यांचे निरसन १७ मे रोजी करून १८ मेपर्यंत निविदा भरण्याची मुदत दिली होती. शेवटच्या तारखेपर्यंत एकाही कंपनीने प्रतिसाद न दिल्याने आणखी एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

अशाच प्रकारच्या जागतिक निविदा मागण्याची घोषणा ठाणे महापालिकेसह इतरही काही महापालिकांनी याआधी केलेली आहे. मात्र मुंबई महापालिकेचा अनुभव पाहता त्यास किती प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी ‘लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढूनही राज्य सरकार आणि पालिकांना प्रतिसाद मिळत नसल्याने खरेदीच्या जागतिक निविदेसाठी केंद्र सरकारने एकसमान धोरण मसुदा (युनिफॉर्म पॉलिसी ड्राफ्ट) जाहीर करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आयसीएमआर आणि डिसीजीआयच्या परवानगीशिवाय जागतिक उत्पादक, लस पुरवठा करू शकत नाही, ही बाब पत्रात अधोरेखित केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here