म. टा. प्रतिनिधी, नागपूरः स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मौद्यात सुरू असलेले समांतर प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय (आरटीओ) उघडकीस आणून फोटो स्टुडिओ मालकाला अटक केली. नवाब जमीर बेग, (वय ५०, रा. ओमसाईनगर, मौदा), असे अटकेतील मालकाचे नाव आहे.

बेग याचा मौद्यात नवाब नावाचा फोटो स्टुडिओ आहे. गत दीड महिन्यापासून तो स्टुडिओमध्ये समांतर आरटीओ कार्यालय चालवित होता. या स्टुडिओतून बोगस परवाने द्यायचा. याबाबत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना माहिती मिळाली. ओला यांनी छापा टाकण्याचे निर्देश दिले. ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार, पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, सचिन मत्ते, सहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मीप्रसाद दुबे, हेडकॉन्स्टेबल विनोद काळे, शिपाई शैलेश यादव, सत्यशील कोठारे, अरविंद भगत, प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड, साहेबराव बहाळे व आरटीओचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमित कराड यांनी छापा टाकला. पोलिसांनी बेग याला अटक केली. त्याच्याकडून आठ बनावट वाहन परवाने, प्रिंटर, कम्प्युटर आदी साहित्य जप्त करण्यात आले.

बेगच्या साथीदाराचा शोध

बेग हा हुबेहूब बनावट परवाने तयार करायचा. त्याला कोणीतरी मदत करीत असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. आरटीओचा कर्मचारी त्याला मदत करायचा का ,याचा तपास पोलिस करीत आहेत. बेग याची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here