महाआघाडीच्या या बैठकीला काँग्रेस किंवा राष्ट्रीय जनता दलाच्या कोणत्याही नेत्याला बोलावण्यात आले नव्हते. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपेंद्र कुशवाहा आणि मुकेश साहनी यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीच्या नेतेपदी निवड होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आरजेडी पक्षाने एकतर्फी निर्णय घेत तेजस्वी यादव यांना महाआघाडीचा नेता आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले. यामुळे महाआघाडीचे अनेक नेते नाराज झाले आहेत. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यापूर्वी महाआघाडीतील कोणत्याही पक्षाशी विचारविनिमय करण्यात आला नसल्याचे महाआघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे.
सर्वच पक्षांकडे आपापला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा
या पूर्वी महाआघाडीचा एक भाग असलेल्या काँग्रेस पक्षाने मीरा कुमार यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून चर्चेत आणलेले आहे. तर, लालूप्रसाद यादव हे तुरुंगात असल्याने राष्ट्रीय जनता दलाने तेजस्वी यादव यांचे नाव मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केले आहे. झीतनराम मांझी यांच्या पक्षाने देखील काही दिवसांपूर्वी मांझी हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे दबक्या आवाजात सांगितले होते. या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील सर्वच पक्षांमध्ये आपल्याच पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्याची स्पर्धा सुरू झाली असून या मुद्द्यावर महाआघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times