जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान पाटील, पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील व मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील हे तिघे जण टाटा इंडीका (एमएच-१९/एपी-१०९४) गाडीने सोमवारी (दि.१७) सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीच्या गावाला गेले होते. येथे श्राध्दाचा कार्यक्रम असल्याने राजेंद्र पाटील पत्नी व मुलीसह सासरवाडीला आले होते. दुपारी साडेतीन वाजता ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले. मात्र, ते भोदला पोहचलेच नाही.
दभाशी पुलावर आढळली बेवारस कार
दरम्यान, सायंकाळी त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. त्यानतंर काल मंगळवारी (दि.१८) दुपारी ४ वाजता एक पुरूषाचा मृतदेह तापीत तरंगतांना परिसरातील नागरिकांना दिसला. जळगाव जिल्ह्याचा क्रमांक असल्याने जळगावातील गृपमध्ये याबाबत चर्चा सुरू असतांना जिल्हा बँकचे संचालक संजय पवार यांनी ही गाडी ओळखल्यानंतर याबाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली. शेतकी संघाचे अध्यक्ष रमेशबापू पाटील यांनी भोद गावी धाव घेतली.
मुलीचाही मृतदेह आढळला
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील देखील माहिती मिळताच त्यांनीही रात्री घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत राजेंद्र पाटील यांच्यासह त्यांची मुलगी ज्ञानल हिचाही मृतदेह तरंगतांना आढळून आला. मात्र, रात्र झाल्यामुळे या दोघांचे मृतदेह बाहेर काढता आले नाहीत. आज सकाळीच हे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. त्यानतंर आज सकाळी पत्नी वंदनाबाई यांचा देखील मृतदेह तरंगताना आढळला. तिन्ही मृतदेह बाहेर काढून शिरपूर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
सामुहीक आत्महत्येचे कारण अस्पष्ट
राजेंद्र पाटील यांच्या कुटूंबियांसोबतच्या आत्महत्येचे गुढ कायम आहे. काल सासुरवाडीला अतिशय सामान्य परिस्थितीत घरून निघालेल्या या कुटूंबाने थेट तापी नदीत उडी का घेतली? अतिशय समृध्द व समाधानी कुटुंब असतांना देखील त्यांनी आत्महत्या केली? तसेच राजेंद्र पाटील हे अतिशय संयमी म्हणून परिचित असतांना त्यांनी पत्नी व मुलीसह आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times