म. टा. प्रतिनिधी, नगरः पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरूवारी (२० मे) करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यासाठी निवडण्यात आलेल्या देशातील ५६ जिल्ह्यांमध्ये राज्यातील १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, सातारा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी व बीड या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांचा संवाद होणार आहे.

गुरुवारी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये संबंधित जिल्ह्याचे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त हे सहभागी होणार आहेत. करोनासंबंधी गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड, झारखंड व ओडिसा या राज्यांतील हे ५६ जिल्हे आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन पंतप्रधानांकडून काही सूचनाही केल्या जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत संबंधित मुख्यमंत्र्यांनाही सहभागी होण्यास सांगण्यात आलेले आहे. ज्या जिल्ह्यांत उपचाराधीन रूग्णांची संख्या जास्त आहे, त्या जिल्ह्यांसाठी ही आढावा बैठक आहे. बैठकीत यासंबंधीच्या उपाययोजनांसोबतच लसीकरण आणि केंद्राकडून अपेक्षित असलेल्या मदतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होऊन काय मुद्दे मांडतात, याकडेही लक्ष लागले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आता परिस्थितीत तुलनेत सावरत आहे. गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत निम्याने घट झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता २० हजारांच्या खाली आली आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत आहे. मात्र, पुरसे लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम संथगतीने सुरू आहे. तर करोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे, या मुद्दयांवरही बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. पीएम केअर फंडातून नगरच्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प मिळाला असून तो पूर्वीच कार्यान्वितही करण्यात आलेला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here