मालती शिंगाडे यांच्या 23 वर्षीय मुलास करोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांची मुलगी आणि पती यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांच्या मुलास उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो व्हेन्टिलेटरवर उपचार घेत आहे, तर त्यांचा पती व मुलगी गावातील शाळेत अलगीकरण कक्षात आहेत.
घरातील सर्वांनाच करोनाची लागण झाल्याने मालती शिंगाडे या मानसिक दृष्ट्या खचल्या. त्या दोन-तीन दिवस निराश होत्या. या नैराश्यात त्यांनी नांदणी येथील मौला शिकलगार यांच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
बुधवारी सकाळी आठ वाजता मालती शिंगाडे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती विजय शिंगाडे यांनी शिरोळ पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
दरम्यान, करोना हा गंभीर आजार असला तरीही वेळेत आणि योग्य उपचार मिळाल्यास या आजारावर मात केली जाऊ शकते. मात्र अनेकजण या विषाणूच्या भीतीमुळे खचून जातात आणि असं टोकाचं पाऊल उचलतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times