म. टा. प्रतिनिधी, जळगावः मुलीच होतात यामुळे राग अनावर झाल्याने लाकडी दांडा डोक्यात मारुन आपल्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने आज बुधवारी जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जन्मदात्या पित्याविरुध्द प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असलेल्या मुलीची साक्ष या खटल्यात महत्वपूर्ण ठरली आहे. पप्पू रतन पवार (वय ३१ रा. पाचोरा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी कस्तुराबाई पप्पू पवार (वय ३०) यांचा खून केला.

पाचोरा येथील विवेकानंद नगर तांडा येथे आरोपी पप्पु रतन पवार हा त्याची पत्नी कस्तुराबाई व तीन मुलींसह राहत होता. पाचोरा येथेच एक हॉटेलवर पप्पू कामाला होता. पप्पु पवार यास दारू पिण्याचे व्यसन होते. कस्तूराबाई यास तीनही मुलीच जन्माला आल्याने तसेच मुलगा होत नाही या कारणावरुन पती पप्पू हा तिला वेळावेळी मारहाण करत होता. याच कारणातून दि. ९ जून २०१९ रोजी रात्री पप्पू याने पत्नी कस्तुराबाईशी भांडण करून तिला शिवीगाळ केली व लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली. यात कस्तूरीबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत कस्तूराबाई यांची आई पद्माबाई सखाराम राठोड (वय ६० रा.आनंद नगर तांडा ता.एरंडोल) यांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला भा.द.वि.कलम ३०२,५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा घडल्यापासून आरोपी कारागृहातच

घटनेच्या दुसर्‍या दिवशीची पोलिसांनी आरोपी पप्पू पवार यास अटक केली होती. तपासधिकारी पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी तपास पूर्ण करुन या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. खटल्यावर सर्वप्रथम तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए.सानप याच्या समोर कामकाज चालले. त्यांच्या समक्ष या खटल्याचे कामी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांच्या समोर सरकार पक्षाने उर्वरित दोन साक्षीदार तपासून खटल्याचे काम पूर्ण केले. गुन्हा घडल्यापासून आरोपी पती हा कारागृहात होता.

सात वर्षाच्या मुलीची साक्ष महत्वपूर्ण

या खटल्यात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी एकूण १० साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने आरोपीची सात वर्षांची मोठी मुलगी गौरी हिची साक्ष महत्वपुर्ण ठरली. कारण ही सर्व घटना तिच्या समोर घडलेली होती. तिने सर्व घटनाक्रम जसाचा तसा न्यायालयासमोर सांगीतला. मारहाण करणारा व्यक्ती कोण आहे ? असे न्यायालयाने विचारले असता तिने तिच्या वडिलांकडे बोट दाखवले होते. या व्यतिरिक्त फिर्यादी पद्माबाई राठोड, डॉ. निलेश देवराज, पंच साक्षीदार व पोलीस उपनिरिक्षक पंकज शिंदे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आज बुधवारी या खटल्याच्या निकालावर कामकाज झाले. यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांनी कस्तुराबाई पवार हिचा खून केला म्हणून तिचा पती आरोपी पप्पु रतन पवार याला दोषी ठरवून जन्मठेपेची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here