सिंगापूरने कडक शब्दात नोंदवला आक्षेप
सिंगापूरमध्ये करोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. यामुळे दिल्लीला करोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केलं होतं. केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर वाद निर्माण झाला आणि सिंगापूर सरकारने बुधवारी भारतीय उच्चायुक्तांना बोलावून कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिक्रियेनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं. दिल्लीचे मुख्यमंत्री हे भारताच्या वतीने बोलत नाही. यामुळे दोन्ही देश करोनाच्या या संकटात एकजुटीने लढतील, असं जयशंकर यांनी सांगितलं.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करोनावरील स्ट्रेनबाबत बोलण्याचा कुठलाही अधिकार नाहीए, असं भारतीय उच्चायुक्त पी कुमारन यांनी सिंगापूर सरकारकडे स्पष्ट केलं, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. भारत सरकारने दिलेले स्पष्टीकरण स्पष्ट आणि पारदर्शक आहे. यामुळे आमचे समाधान झाले आहे, असं सिंगापूरच्या उच्चायुक्तालयाकडून सांगण्यात आलं. तसंच प्रमुख राजकीय पदांवर असलेल्या नेत्यांनी खोटं पसरवू नये आणि जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे, असं सिंगापूरने म्हटलं.
POFMA कायद्यांतर्गत कारवाई करू शकतोः वोंग
सिंगापूरमध्ये एक कायदा आहे ज्याचं नाव प्रोटेक्शन फ्रॉम ऑनलाइन फॉल्सहुड्स अँड मॅन्युप्युलेशन अॅक्ट (POFMA). हा कायद्या अफवा आणि खोटी माहिती रोखण्याविरोधात आहे. यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेल्या वक्त्यांविरोधात POFMA कायद्यांनुसार कारवाई करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असं भारतातील सिंगापूरचे उच्चायुक्त वोंग यांनी सांगितलं. तसंच दिल्ली सरकारने उपस्थित केलेले मुद्देही त्यांनी फेटाळून लावले.
काय आहे हे प्रकरण?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरची हवाई सेवा तात्काळ बंद करण्याची मागणी केली होती. तसंच सिंगापूरमध्ये करोनाचा नवीन स्ट्रेन आहे. हा स्ट्रेन विशेषकरून लहान मुलांसाठी घातक आहे. यामुळे देशात करोनाची तिसरी लाट येऊ शकते, असं केजरीवाल म्हणाले होते. पण सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने केजरीवाल यांचे हे दावे त्यानंतर लगचेच फेटाळून लावले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times