गडचिरोली: जिल्ह्यातील अहेरी परिसरात गौण खनिज वाहतुकीचा गोरखधंदा सुरू असून यासाठी अवैध वाहतूकदारांकडून विविध शक्कल लढवल्या जात आहे. मंगळवारी (१८ मे) रोजी अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी अतिशय शिताफीने तपासणी दौऱ्यादरम्यान निदर्शनास आलेल्या मुरुमाच्या चोरट्या वाहतुकीच्या प्रकारचा भांडाफोड केला आहे. यामध्ये मुरुमाच्या वाहतूक परवाना लिहिण्यासाठी चक्क मॅजिक पेनचा वापर करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली असून या प्रकरणी अहेरीच्या तहसीलदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अहेरीचे पोलीस ठाण्यात प्रभाकर लक्ष्‍मण डोंगरे व संतोष अग्रवाल दोघेही राहणार अल्लापल्ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहेरी येथील तहसीलदार १८ मे रोजी तपासणीसाठी नागेपल्ली अल्लापल्ली परिसरात दौरा करीत असताना नागेपल्ली येथील रहिवासी गिल्लास रत्नम यांच्या घरासमोर एमएच ३३ टी ११४६ या क्रमांकाच्या ट्रॅक्टर मधून मुरूम टाकण्यात येत असल्याचे दिसून आले. तहसीलदारांनी याबाबत चौकशी केली असता, वाहनचालकाकडे प्रभाकर डोंगरे यांच्या नावे निर्गमित केलेली वाहतूक पास आढळून आली. मात्र, या पासवर नमूद अक्षरे द्वारे लिहिल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे मॅजिक पेनद्वारे लिहिलेली अक्षरे गरम केल्यास शाही आपोआप उडून जात असल्याचेही तहसीलदारांनी पडताळून पाहिले. दरम्यान, प्रकरण अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊन ट्रॅक्टर चालकाने येथून वाहनासह पळ काढला. यामध्ये काही अंतरावर उभा असलेला संतोष अग्रवाल संशयास्पद स्थितीत दिसून आला. त्यामुळे तहसिलदारांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेत मुरूम आणल्याचे ठिकाण दाखविण्यास सांगितले. मात्र, त्याने तहसीलदारांना त्यांचे वाहन फसेल अशा रस्त्याने नेले व स्वतः पळ काढला.

तहसिलदारांनी पुन्हा तपासणी करून बुर्कमपल्ली येथे सर्वे नंबर १६ मध्ये पाहणी केली. यावेळी सदर ठिकाणी अंदाजे ९ ट्रॅक्टर व जेसीबी उभे असल्याचे आढळून आले. सदर वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, सात ट्रॅक्‍टर चालकांनी घटनास्थळावरुन पळ काढला. तर, एमएच ३३ टी ०५७१ व एमएच ३३ व्ही ७१६४ ही दोन वाहने थांबविण्यात आली. मात्र, यात वाहन चालकाकडेही मॅजिक पेन द्वारे लिहिलेली पास आढळून आली असून ही पास प्रभाकर डोंगरे यांना दिलेल्या परवान्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परवानाधारक प्रभाकर डोंगरे व त्याचा साथीदार संतोष अग्रवाल यांनी शासनाची दिशाभूल करून वाहतूक पासवर अवैधपणे माहिती लिहून मुरूम उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आसावरी शेडगे करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here