मुंबईः मोदी सरकारने खतांच्या दरवाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. डीएपी खतांवर १२०० रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. डीएपीची एक पोतं आता २४०० ऐवजी १२०० रुपयांना मिळणार आहे. मोदी सरकारने हा निर्णय घेताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक ट्विट केलं आहे. केंद्रीय खत व रसायन मंत्री श्री सदानंद गौडा यांनी शरद पवारांच्या पत्राची दखल घेतली असल्याचं, राष्ट्रवादीनं म्हटलं आहे.

केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी खतांच्या दरवाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सध्याच्या संकटांच्या काळात खतांच्या किंमती वाढवणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असून ही दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी करणार पत्र शरद पवार यांनी मंत्री सदानंद गौडा यांना लिहलं होतं. या पत्राची दखल घेत गौडा यांनी पवारांना फोन करुन रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचं आश्वासन दिलं, असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे.

रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावे, केंद्रीय खत व रसायन मंत्री श्री. डी. व्ही. सदानंद गौडा यांना या प्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे आणि किंमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घ्यावी अशी विनंती आदरणीय शरद पवारांनी केली होती. या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी शरद पवार यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. पत्रातील सूचनांचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे अश्वासन त्यांनी पवारांना दिले होते, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ट्विटनंतर काही तासांतच खत दरवाढीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here