मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर असणार आहे. यावेळी ते नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून गावकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. यानंतर अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेत मदत देण्यावर चर्चा केली जाईल अशी माहिती आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा आर्थिक तडाखा दिला आहे. गरीब मच्छिमार, शेतकऱ्यांबरोबरच आंबा बागायतदार आणि फळ उत्पादकांनाही बसला असून घरे, मच्छिमार बोटी, गोठे जमीनदोस्त झाल्याने प्रचंड हानी झाली आहे.
चक्रीवादळानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येऊ लागली असून, आता नुकसानीचे आकडेही पुढे येऊ लागले आहेत. वादळामुळे आंबा, काजू, नारळ बागायतीचे अतोनात नुकसान झाले असून हा आकडा पाच कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे. जसजसे पंचनामे होतील, तसतसे हे आकडे वाढत जाणार आहेत.
सर्वाधिक फटका बसलेल्या देवगड तालुक्यामध्ये पाचशेहून अधिक घरे, गोठे व चार जिल्हा परिषद शाळांचे एकूण दीड कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. तर १३२ विद्युत खांब व वाहिन्या तुटून २७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कलंबई केळयेवाडी तसेच विजयदुर्ग दशक्रोशीमध्येही अनेक गावांमध्ये तीन दिवस ग्राहकांना विजेविना रहावे लागले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times