: यांनी आज घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखे बसवून ठेवल्याची आगपाखड पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली असली तरी महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्रातून बोलण्याची संधी मिळालेले अहमदनगरचे डॉ. राजेंद्र भोसले यांनी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे करोनाशी लढा देण्यात यश येत असल्याचं डॉ. भोसले यांनी सांगितलं आहे.

या बैठकीनंतर स्वत: मुख्यमंत्री ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनीही डॉ. भोसले यांना फोन करून त्यांचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी यांची माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी यावर समाधान व्यक्त केले. मात्र, प्रत्येक उपायाची माहिती सांगताना डॉ. भोसले यांनी त्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना दिले.

याआधी अशा आढावा बैठकांतून पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केल्याच्या बातम्या आल्या होत्या. आज मुख्यमंत्र्यांना बोलण्याची किंवा पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची वेळ आली नसली तरी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करून याही वेळी त्यांना देशपातळीवरील बैठकीत चर्चेत ठेवले.

या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. नगरहून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, सर्व नोडल अधिकारी सहभागी झाले होते.

डॉ. भोसले यांनी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच इतर सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील करोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्याच्या संकल्पनेतून आखलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाची माहितीही त्यांनी दिली.

राज्य सरकारने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याने करोना बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य झाले. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून केलेले प्रयत्न, खासगी डॉक्टरांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन या गोष्टींचा डॉ. भोसले यांनी आर्वजून उल्लेख केला.

ग्रामीण भागात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना डॉ. भोसले यांनी आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये राज्याच्या आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. ज्या पद्धतीने हिवरे बाजार करोनामुक्त झाले, तीच पद्धत इतर गावांत अवलंबण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासह स्थानिक पातळीवरील इतर उपाययोजांनांची त्यांनी माहिती दिली.

ही बैठक संपल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पालकसचिव आशीषकुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवरांनी दूरध्वनी करुन डॉ. भोसले यांचे कौतुक केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here