मुंबई : ‘तौक्ते चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आला असतानाही ओएनजीसीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ७०० कामगारांचा जीव धोक्यात टाकला. ओएनजीसीने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्यानेच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
ओएनजीसीने तातडीने कामगारांना परत बोलवायला हवं होतं. पण दुर्लक्षामुळे तब्बल ३७ कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या ओएनजीसीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबई हाय जवळील नौका दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभरात आणखी ११ कर्मचाऱ्यांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. या दुर्घटनेत नौदलाला १८६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं आहे.

‘ओएनजीसी’च्या हीरा इंधन विहीर परिसरात ‘पापा ३०५’ ही बार्ज (तेल उत्खनन करणारा निवासी तरंगता फलाट) नौका ‘तौक्ते’ चक्रीवादळात सोमवारी रात्री समुद्रात बुडाली. अपघातावेळी २६१ कर्मचारी तेथे कार्यरत होते. या सर्व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या पाच युद्धनौका, तटरक्षक दलाच्या दोन नौका तसेच, दोन अन्य जहाजे सोमवार सायंकाळपासून बचावकार्य करीत आहेत. याशिवाय नौदलाची ‘सी किंग’ हेलिकॉप्टर आणि ‘पी ८ आय’ हे टेहाळणी विमानही मोहिमेत मदत करीत आहे.

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व बचाव पथकाच्या प्रयत्नातून १८६ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले; परंतु बुधवारी ३६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले. त्यानंतर बचावकार्य सुरू असताना रात्री आणखी ११ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले त्यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३७वर गेला. आयएनएस कोलकाता बुधवारी रात्री कर्मचाऱ्यांचे मृतदेह घेऊन मुंबईत पोहोचली. नौदलाचे बचावकार्य अखंडपणे सुरू आहे. बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अरबी समुद्र पिंजून काढत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here