वाचा:
चक्रीवादळानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणात पाहणी दौरा करत आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. शुक्रवारी प्रत्यक्ष देवगड व अन्य भागांत ते नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यापूर्वी आज त्यांनी जिल्हाधिकार्यांशी आणि अन्य अधिकार्यांशी चर्चा केली. रवींद्र चव्हाण, नितेश राणे, प्रसाद लाड यावेळी त्यांच्यासोबत होते. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलले. निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी हेक्टरी ५० हजार म्हणजे एका झाडाला ५०० रुपये मदत घोषित करण्यात आली होती. आता त्याहून मदत दिली जावी अशी आमची मागणी आहे. उद्या मुख्यमंत्री कोकणात येत आहेत, तर त्यांनी भरघोस मदत जाहीर करावी आणि निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वाचा:
नियमित कर्जमाफीचा कोकणातील शेतकर्याला फायदा होत नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांनी कर्जमाफीची केलेली मागणी अतिशय रास्त आहे. त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, असे ते म्हणाले. मासेमारांना तर कोणतीच मदत मिळाली नाही. निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी सर्वे झाले पण पुन्हा परत फिरून कुणीच आले नाही, असे मासेमारांचे म्हणणे असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. वीज पायाभूत सुविधा भूमिगत करण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने योजना तयार केली आहे. या योजनेचा लाभ घेत कोकणासाठी एक कालबद्ध कार्यक्रम ठरवून ही योजना पूर्णत्त्वास नेली पाहिजे. असे केल्यास वारंवार येणार्या वादळांमुळे भविष्यात वीजेच्या बाबतीत असे नुकसान होणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
वाचा:
मुख्यमंत्री मालवण आणि वेंगुर्ले भागात करणार पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मालवण आणि वेंगुर्ले भागात ते नुकसानीची पाहणी करणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांचा सिंधुदुर्ग दौराही उद्याच आहे. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज मदत म्हणून सहा ट्रक सिमेंटचे पत्रे आले असून त्याचे वाटप सुरू झाले आहे. आमदार वैभव नाईक यांनी ५ हजार कौले स्वखर्चाने वितरित केली आहेत. वादळग्रस्तांना मदत देण्यासाठी संदेश पारकर तसेच अतुल रावराणे हेसुद्धा सरसावले आहेत. चक्रीवादळ आणि नुकसान झालेल्या प्रत्येकापर्यंत मदत जाईल, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे नेते एकाच दिवशी जिल्ह्यात पाहणी करणार असल्याने यातून वादळग्रस्तांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times