नागपूरः मुलाला घरी आणा. मला करमत नाही, असे म्हणत मुलाला बघण्यासाठी व्याकुळ झालेल्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ह्दयद्रावक घटना नरखेडमधील वॉर्ड क्रमांक १४ येथे बुधवारी सकाळी घडली. पंचफुला रत्नाकर लथाळ (वय ४९),असे मृतकाचे नाव आहे. पंचफुला या गृहिणी होत्या.

रत्नाकर हे माजी सैनिक असून, सध्या ते टपाल विभागात कार्यरत आहेत. त्यांचा मोठा मुलगा पुण्यातील खासगी कंपनीत काम करतो. लहान मुलगा लष्करात जवान असून तो सध्या आसाम येथे तैनात आहे. पंचफुला यांना मोठ्या मुलाची सतत आठवण यायची. मुलाला घरी घेऊन या,असे त्या रत्नाकर यांना म्हणाल्या. लॉकडाउन असल्याने सध्या मुलाला आणता येत नाही व तोही येऊ शकत नाही. लॉकडाउन संपताच त्याला घेऊन येऊ,असे रत्नाकर हे पंचफुला यांना म्हणाले. त्यानंतर ते टपाल कार्यालयात गेले. याचदरम्यान पंचफुला यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. काही वेळाने रत्नाकर यांनी पंचफुला यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. पंचफुला यांनी प्रतिसाद दिला नाही. रत्नाकर घरी आले असता पंचफुला या गळफास लावलेल्या दिसल्या. त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी जमले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू गजभिये यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोद केली आहे. या घटनेने नरखेडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here