मधुसूदन नानिवडेकर। सिंधुदुर्ग

दरवर्षी अलोट गर्दीत पार पडणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा १७ फेब्रुवारीपासून सुरू होत असून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आंगणे कुटुंबीय आणि प्रशासनाच्यावतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन घेता यावे म्हणून नऊ रांगाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंगणेवाडी येथे दरवर्षी भराडीदेवीच्या यात्रेला प्रचंड गर्दी होत असते. मुंबई, पुणे या शहरांतून भाविक मोठ्या प्रमाणावर यात्रेला येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती असून राजकीय नेतेमंडळीही मोठ्या संख्येने यात्रेला येत असतात. आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री या सर्वांचीच मांदियाळी यात्रेत पाहायला मिळते.आंगणेवाडीच्या यात्रेला यंदा भाविकांची गर्दी नवा उच्चांक गाठेल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री येणार यात्रेला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंदा यात्रेत सहभागी होणार असल्याने शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी यंदा पाहायला मिळणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर हाय मास्ट टॉवरचे आणि जिओ टॉवरचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी यात्रेच्या नियोजनाचा आढावाही घेतला. पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला यात्रा सुरळीत पार पडण्यास सज्ज रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here