तौक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा चार तासांचा आहे. त्यातून परिस्थितीचं आणि संकटाचं गांभीर्य कसं कळणार, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी मी हॅलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही, प्रत्यक्ष जमिनीवर उतरुन आढावा घेतोय, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला आहे. व नुकसान झालेल्या शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत तातडीने करावेत असे सांगितले आहे. कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, केवळ फोटो सेशनसाठी नाही प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
कसा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री सकाळी ८.३५ वाजता जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत. सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने ते मालवणकडे प्रयाण करतील. त्यानंतर सकाळी १०.१० वाजता वायरी, ता.मालवण येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील, तर सकाळी १०.२५ वाजता मालवणमध्ये दाखल होऊन तेथील पडझडीची पाहणी करतील. मुख्यमंत्री ठाकरे सकाळी ११.०५ वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times