मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक असा वाद पेटल्याचं दिसत आहे. अशात दिल्लीनंतर मुंबईतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टरवरून मोठा वाद गेल्या काही दिवसांत सुरू आहे. आता हाच वाद पेटण्याची चिन्ह आहेत. कारण, भाजपच्या काही अधिकाऱ्यांनी काँग्रेसने लावलेले हे पोस्टर फाडून पायदळी तुडवले आहेत.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा एक व्हिडिओदेखील भाजपकडून शेअर रण्यात आला आहे. यामध्ये भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी देशविरोधी ‘टूलकिट’मधून प्रेरणा घेतलेले काँग्रेसचे बॅनर फाडून फेकले आहेत.

खरंतर, आमच्यासाठी असणाऱ्या लसी परदेशात का पाठवण्यात आल्या असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला होता. यावर महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांची नावंही लिहण्यात आली होती. पण हा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान असल्याचं सांगत भाजप खासदारांनी अधिकाऱ्यांसोबत हे पोस्टर्स फाडून पायाखाली तुडवले.

हा व्हिडिओ भाजप मुंबई या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी लिहण्यात आलं की, ‘कोविडच्या संकटात महाराष्ट्राची वेळोवेळी काळजी वाहणाऱ्या पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसला भाजपाने चांगलाच दणका दिला. ईशान्यमुंबईचे खासदार @manoj_kotak यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी देशविरोधी ‘टूलकिट’मधून प्रेरणा घेतलेले काँग्रेसचे बॅनर फाडून फेकले.’

दरम्यान, करोनाच्या जीवघेण्या संसर्गात देशात सध्या लसींचा आणि महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा आहे. यामुळे मोठी भीषण परिस्थिती ओढावली आहे. तर आमच्यासाठी घेतलेल्या लसी या परदेशात पाठवण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीतही मोदींविरोधात बॅनरबाजी करण्यात आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here