मुंबई: चाइल्ड पोर्नोग्राफीची गंभीर दखल सायबर पोलिसांनी घेतली असून मुंबईतील साकीनाका येथून एका भाजी विक्रेत्याला शुक्रवारी अटक केली आहे. हरिप्रसाद पटेल असे या भाजी विक्रेत्याचे नाव असून मुंबईतील हा अशाप्रकारचा बहुदा पहिला गुन्हा असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अॅलण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन’(एनमॅक) ही संस्था चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कार्यरत आहे. समाजमाध्यमे, संकेतस्थळांवरील चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत ही संस्था अमेरिकेच्या ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन’(एफबीआय) या सर्वोच्च तपास यंत्रणेला माहिती पुरवते. भारतातून अशा ध्वनिचित्रफिती किंवा मजकूर जाहीर करणाऱ्या व्यक्तींची तांत्रिक माहिती पुरवण्याबाबत या संस्थेशी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) करार केला आहे. त्यानुसार या संस्थेने चाइल्ड पोर्नोग्राफी पसरविणारे आयपी अॅड्रेस आणि अन्य तांत्रिक माहिती पुरवली.

उपलब्ध माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी मूळचा उत्तरप्रदेशचा असलेल्या आणि सध्या साकीनाका येथे राहणाऱ्या हरिप्रसाद पटेल विरोधात गुन्हा दाखल केला. पटेल याने गेल्या वर्षी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर लहान मुलांचा एक अश्लील व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याचे अकाऊंट बंद केले होते. तरीही हरिप्रसाद याने मित्राच्या मोबाइलवरून नवीन अकाऊंट तयार केले आणि पुन्हा लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड केले. याप्रकरणी माहिती मिळताच सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुक्रवारी त्याला अटक केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here