: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी काम करत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने एका खासगी कंपनीत तब्बल ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. कंपनी आणि बँकेचा थेट व्यवहार असताना शेतकऱ्यांच्या बँकेला चुना लावत तब्बल ३ कोटी ३९ लाख रुपयांची दलाली देण्यात आल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. ही दलाली कुणाला गेली, हा प्रश्न सोडविण्यासाठी आता पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शन घेण्याचे ठरविलं आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०१३ ते २०१९ या काळात तब्बल ७०० कोटी रुपये निप्पोन कंपनीत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केले. या गुंतवणुकीच्या व्यवहारातून बँकेला सुमारे २६८ कोटी रुपये फायदा झाला असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले असताना ३ कोटी ३९ लाखाची दलाली कुणाच्या घशात गेली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पोलीस चौकशी दरम्यान निप्पॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सदर रक्कम थेट संपर्क करुन गुंतवणुकीसाठी घेतल्याचे सांगितले. त्यामुळे थेट संपर्क असताना दलाली कशासाठी? हा प्रश्न पोलिस चौकशीत उपस्थित झाला आहे.

या प्रकरणात कोतवाली पोलिसांकडे सुमारे दीड महिन्यांपूर्वी पंधरा शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. तक्रारीच्या अनुषंगानेच पोलिसांनी बँकेचे प्रशासक सतिश भोसले यांना सखोल माहिती मागवली होती. त्यामुळे भोसले यांनी बँकेचे ऑडिट करुन घेतले. त्यावेळी त्यांच्या ऑडिटमधूनच ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली गेल्याचा हा प्रकार समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

वास्तविक गुंतवणूक करणारी बँक आणि गुंतवणुकीसाठी रक्कम घेणारी कंपनी एकमेकांसोबत थेट व्यवहार करत असताना दलाली देण्यात आली. ही दलाली दिली नसती तर ही ३ कोटी ३९ लाख रुपयांची रक्कमसुद्धा बँकेलाच मिळाली असती. पर्यायाने दलालीमध्ये गेलेली ही रक्कम म्हणजे बँकेचे नुकसान असल्याच्या निष्कर्ष पोलिस तपासातून निघाला आहे. या आर्थिक गुन्हेगारी संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती ठाणेदार राहुल आठवले यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here