नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी अरुणाचल प्रदेश सेक्टरला लागू असलेल्या उत्तर सीमेवर सैन्याच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. लष्कर प्रमुख नरवणे यांनी जवानांच्या सतर्कतेचं कौतुक केलं. पण एलएसीवर अतिशय सतर्क राहणं आणि सीमेपलिकडील चिनी सैन्याच्या हरकतींवरून अलर्ट राहण्याची सूचनाही जनरल नरवणे यांनी दिली.

पूर्व लडाखमध्ये एलएसीच्या पलिकडे काही दिवसांपासून चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी अरुणाचल-सिक्कीमला लागून असलेल्या सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे. यामुळे लष्कर प्रमुख जनरल नरवणे हे गुरुवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दिमापूरमध्ये पोहोचले. पहिल्या दिवशी त्यांनी अरुणाचल प्रदेशला लागून चीन सीमेवरील सैन्याच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी शुक्रवारी ईशान्येतील राज्यांच्या सुरक्षेची म्यानमारला लागून असलेल्या सीमेवरील सुरक्षा आव्हानांचा आढावा घेतला. या आढावा बैठीकत दिमापूरमधील लष्कराच्या हेडक्वॉर्टरचे कमांडर लेफ्टनंट जनरल जॉन्सन मॅथ्यू आणि जनरल ऑफिसर कमांडिंगसह लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चीनच्या कुरापतींचा पूर्वानुभव पाहता भारतीय लष्कर अधिक सतर्क

चिनी सैन्याच्या एलएसीवरील वाढत्या हालचाली आणि पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेत कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी भारतीय लष्कराकडून घेतली जात आहे. खासकरून अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमला लागून असलेल्या सीमांवर चीनच्या कुरापतींचा काळा इतिहास पाहता भारतीय लष्कर पूर्वीपेक्षाही अधिक सतर्क आहे.

लडाखजवळ चिनी सैन्याकडून वार्षिक अभ्यास आणि प्रशिक्षण घेण्यात येते. आताही ते सुरू आहे आणि त्यांच्या हालचालींवर भारतीय लष्कर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसंच कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराची पूर्ण सज्जता आहे. तसंच जोपर्यंत चिनी सैनिक पूर्व लडाखमदून एलएसीच्या भागातून मागे हटत नाही तोपर्यंत भारतीय लष्करही उत्तर सीमेवरील आपल्या सैनिकांची तैनाती कमी करणार नाही, असं लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी बुधवारीच स्पष्ट केलं आहे.

परराष्ट्र मंत्र्यांनीही चीनला सुनावले

एलएसीवरील कुरापतींवरून भारताकडून सतत चीनला कडक संदेश दिले जात आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही गुरुवारी चीनला कडक शब्दांत सुनावलं. एलएसीवरील तणावर दूर होत नाही तोपर्यंत चीनसोबत सहकार्याचे संबंध शक्य नाही, असं जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here