औरंगाबाद : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या लोकसभा मतदार संघ वाराणसीतल्या डॉक्टरांशी थेट संवाद साधला. डॉक्टरांशी बोलताना ‘कोविडविरुद्ध सुरू असलेल्या या लढाईत आपण आपल्या जवळच्या अनेकांना गमावावं लागलंय’, असं म्हणताना ते भावूकही झाले. करोनात जीव गमावलेल्या श्रद्धांजली वाहताना त्यांना अश्रूही अनावर झाले. यावरच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोदींवर नाव न घेता खोचक टीका केली आहे.

इम्तियाज जलील यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये लिहिलं की, ‘नेहमी मला वाटायचं की दिलीप कुमारांपेक्षा चांगला भावनिक अभिनय कोणीच करू शकत नाही, पण मी चूक होतो’, अशी खोचक टीका नाव न घेता जलील यांनी केली आहे.

खरंतर, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अनेक सत्ताधारी आणि विरोधक नेते दौऱ्यावर आहेत. यावरून मोठं राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने आरोप केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर शिवसेना, काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे.

दरम्यान, कालच्या संवादात काशीचा सेवक म्हणून मी इथल्या प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: आपले डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी यांचं काम कौतुकास्पद आहे. करोना संक्रमणानं आपल्या अनेक प्रिय व्यक्तींना आपल्यापासून हिरावून घेतलंय. करोनाला बळी पडलेल्या सर्व मृतांविषयी मी आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो, असं यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या अनेक स्तरांवर एकत्र येत दोन हात करावे लागत आहेत. यंदाचा संक्रमण दरही गेल्या वेळेपेक्षा कित्येक पटीनं अधिक आहे. रुग्णांना अधिक दिवस रुग्णालयात राहावं लागत आहे. यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर परिणाम दिसून येत आहे, असं यावेळी त्यांनी नमूद केलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here