नागपूरः करोनाला आळा घालण्यासाठी एकीकडे लसीकरणानं वेग घेतलाय तर दुसरीकडं गर्दीमुळं सुपर स्प्रेडरही वाढतायत. लसीकरण केंद्रांपासून ते ज्या ठिकाणी करोनाचं निदान होतं, तिथंही रांगा पहायला मिळतायत. या गर्दीमुळं एखाद्याला करोना झालेला नसला तरी विषाणू संक्रमणाची भिती वाढत आहे. आरटीपिसीआर सारख्या चाचण्यांचा अहवाल येण्यासही विलंब लागतोय. यातून प्रादुर्भाव साखळी खंडीत करणे अशक्य होऊन बसलंय. त्यामुळं ही साखळी मोडण्यासाठी आता प्रशिक्षित श्वानांचीही मदत घेऊन सुपर स्प्रेडर शोधणे नव्या संशोधनातून शक्य झालंय.

अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठाने केलेल्या या अद्ययावत संशोधनाचा आपल्याकडेही आधार घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रादुर्भावाचा सोर्स शोधणे (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) जवळजवळ अशक्य होऊन बसलंय. त्यामुळे प्रशिक्षित श्वानांच्या मदतीनं कोव्हिडचा विषाणू पसरविणाऱ्या सुपर स्प्रेडरला शोधणे शक्य होणार आहे. गर्दीची ठिकाणं, रेल्वे स्थानकं, बस स्टँड, सिनेमागृहे, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूकीची साधने अशा ठिकाणी या श्वानांची मदत घेऊन कोव्हिड विषाणूची बाधा झालेल्यांना शोधणे शक्य होणार आहे.

काय आहे संशोधन?

कोव्हिड विषाणूची बाधा झालेल्यांच्या घामाला, लाळेला वा लघवीला विशिष्ट प्रकारचा वास – गंध येत असतो. रक्तातल्या मेटाबॉलिझम या विशिष्ट घटकामुळं हा वास येतो. विशिष्ट गंध प्रशिक्षित श्वानांना सुंघायला दिल्यास श्वानांच्या नाकातील सुक्ष्म कण तो गंध मेंदूकडे पाठवितात. त्यामुळे प्रशिक्षित श्वान विशिष्ट प्रकारे भूंकून संशयिताला वा सुपर स्प्रेडरला शोधून काढू शकतो.

स्निफर डॉग्जच का?

गुंतागुंतीच्या गुन्हे प्रकरणात, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये, बॉम्ब शोध पथकात स्निफर डॉग्जची मदत घेऊन गुन्ह्यांचा छडा लावला जातो. इतकेच नाही तर पार्किन्सन्स, इपिलिप्सि (मिरगी), मधुमेहापासून ते ट्यूमर सारख्या आजारातही प्रशिक्षित श्वानांची मदत घेतली गेली आहे. माणसांच्या तुलनेत श्वानांची वास घेण्याची क्षमता हजारो पटिंनी अधिक असते, हे देखील संशोधनातून सिद्ध झालंय. त्यामुळे कोव्हिड निदानातही प्रशिक्षित श्वानांना कोव्हिडची बाधा झालेल्यांची लाळ, लघवी वा घामाचा विशिष्ट वास सुंघवून त्याच्याशी साधर्म्य असलेल्यांना शोधणं शक्य झालंय. यातून श्वानांनी संकेत दिलेल्यांपैकी ९९ टक्के संशयितांच्या घशातील स्वाब नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here