औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केली आहे. १९८८ पासून ही मागणी शिवसेनेची होती. औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी शुक्रवारी उपस्थित केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. ‘मी पक्षाचा झेंडा बदलला आहे, पक्षाची भूमिका तीच आहे. काही लोकांनी आपल्या भूमिका बदलल्या आणि सत्तेत आले. त्यांना जाब विचारण्याची कोणाची हिंमत नाही’, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एप्रिलमध्ये औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. मनसेने ‘मिशन औरंगाबाद’ हाती घेतले आहे. यासाठी ते दौऱ्यावर होते.
एखाद्या शहराचा विकास हा माझा राजकीय अजेंडा नाही, माझे पॅशन असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मला हिंदू जननायक म्हणू नका, असे आवाहन राज यांनी केले आहे. मनसेच्या पहिल्या राज्य अधिवेशनात झेंड्याचा रंग बदलण्यात आला. त्यानंतर मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला. राज ठाकरे यांच्याकडे ‘हिंदू जननायक’ म्हणून पाहिले जात आहे. ‘ही उपाधी आमच्या पक्षाकडून देण्यात आलेली नाही. एका वृत्तवाहिनीने असे म्हटले आहे. तुम्ही त्यांना हे विचारू शकता, परंतु मला हिंदू जननायक म्हणू नका’, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
मनसे हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करीत आहे. यावर राज म्हणाले, ‘मी भूमिका बदललेली नाही. घुसखोरांना आणि पाकिस्तानी कलाकारांना मी पूर्वीपासून विरोध केलेला होता. उलट भूमिका बदलून अनेकांनी सत्ता स्थापन केली आहे.’
राज ठाकरे उवाच :
‘व्हॅलेंटाइन डे’ला विरोध करण्यापेक्षा महिलांवरील अत्याचारांकडे लक्ष द्या.
निवडणुकांच्या वेळी राजमुद्रेऐवजी झेंड्यात रेल्वे इंजिन दिसेल.
कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास झालाच पाहिजे.
पुलवामा हल्ल्यामध्ये अनेक संशयास्पद पुरावे समोर.
शरद पवारांशी माझे चांगले संबंध आहेत.
झेंड्यात बदल झाला; पण भूमिकेत कुठेही बदल झालेला नाही.
झेंड्याबद्दल निवडणूक आयोगाची नोटीस आलेली नाही.
मनसेने छेडलेल्या मुद्यांना कोणीही हात घातलेला नाही.
मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर येईन, धर्माकडे वाकडे बघाल तर हिंदू म्हणून समोर येईन
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times