मुंबईः मुंबई हाय येथील हिरा तेल विहीरजवळ समुद्रात बुडालेला बार्ज अखेर नौदलाला ३० मीटर खोलीवर सापडला. शनिवारी केलेल्या शोधमोहिमेनंतर नौदलाला हा बार्ज शोधण्यात यश आलं आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळं ‘ओएनजीसी’च्या हीरा इंधन विहीर परिसरात ‘पापा ३०५’ ही बार्ज समुद्रात बुडाली. ही इंधनविहीर ओएनजीसीची होती, तर बार्जचे परिचालक अॅफकॉन्स या कंपनीचे होते. अपघातावेळी २६१ कर्मचारी तेथे कार्यरत होते. त्यातील १८६ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात नौदलाच्या बचावपथकांना यश आलं आहे. मात्र, या दुर्घटनेत ६६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ९ जणं बेपत्ता आहेत. चक्रीवादळात जलसमाधी घेतलेल्या पी ३०५ या बार्जवरील कामगारांच्या मृत्यूप्रकरणी येलो गेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.

‘पी ३०५’ या बार्ज दुर्घटनेच्या शोधकार्यासाठी नौदल कसून प्रयत्न करत आहेत. शनिवारी दिवसभराच्या शोधानंतर समुद्राच्या तळाशी हा बार्ज सापडला.
‘आयएनएस मकर’ या कॅटामरान श्रेणीतील नौकेने विशेष सोनार रडारच्या साहाय्याने त्याचा शनिवारी रात्री शोध लावला, असल्याची माहिती नौदलानं दिली आहे.

नांगर तुटल्यामुळं बार्ज धडकला

वादळात अडकलेला बार्ज तीन नांगर टाकून उभा होता. पण दुपारी एकाएकी लाटांचा आणि वाऱ्यांचा जोर अनपेक्षितरित्या वाढला. लाटा बार्जच्यावरून जाऊ लागल्या. त्यामुळे एकेक करून तिन्ही नांगर लाटांच्या धडाक्यात तुटून वाहून गेले. त्यानंतर हा बार्ज समुद्रात अस्थिर झाला. त्यात तो तेल उत्खनन विहिरीच्या एका खांबाला जाऊन धडकला. त्यामुळे तिरपा झाला. त्यात पाणी आत शिरू लागले आणि अवघ्या काही तासांत तो समुद्रात बुडाला, असे स्पष्टीकरण ‘ओएनजीसी’ने दिले आहे.

मुंबई हाय दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

बार्जवरील मुख्य अभियंता मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांच्या जबाबावरून कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लव यांच्यासह अन्य काही जणांवर ही कारवाई करण्यात आली. चक्रीवादळाची सूचना देऊन, तसेच कर्मचारी वारंवार सांगत असूनही कॅप्टन राकेश बल्लव यांनी ऐकले नसल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी बल्लव यांच्यावर काही जखमी, दुखापत झालेल्या व बुडालेल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, स्वतः बल्लव अद्याप बेपत्ता आहेत. त्यांना बार्ज समद्रातून हलवू नये यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याची शक्यता असल्याने अनोळखी व्यक्तींनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here