नवी दिल्ली : अष्टपैलू रवींद्र जडेजाला आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली होती. ही गोष्ट कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसेल. पण जडेजावर आयपीएलच्या प्रशासकीय समितीने एका वर्षाची बंदी घातलेली होती. बंदी घालण्याएवढं जडेजाने नेमकं काय केलं होतं, जाणून घ्या…

नेमकं घडलं काय होतं, पाहा…रवींद्र जडेजाने २००८ साली झालेल्या युवा विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. त्यावेळी राजस्थानचा कर्णधार आणि प्रशिक्षक असलेल्या शेन वॉर्नने जडेजाला आपल्या संघात दाखल करुन घेतले होते. त्यावेळी जडेजा हा राजस्थान रॉयल्सच्या संघाचा एक भाग होता. जडेजा त्यानंतर २००८ आणि २००९ या दोन्ही वर्षी राजस्थानच्या संघाकडून खेळला होता. त्याचदरम्यान जडेजाची भारतीय संघातही निवड झाली होती.

राजस्थानच्या संघात असताना जडेजा हा अन्य संघांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळाले होते. जास्त किंमत देऊन कोणता संघ आपल्याला स्थान देऊ पाहत आहे का, हे जडेजा करत होता. आयपीएलच्या नियमांचा भंग यावेळी झाला. कारण आयपीएलच्या नियमांमध्ये खेळाडूने दुसऱ्या संघाबरोबर अशा बाबतीत चर्चा करु नये, असा नियम आहे. त्यामुळे जडेजावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे २०१० साली जडेजा हा आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता.

जडेजा हा २०१० साली आयपीएलच्या बाहेर होता आणि यावेळी त्याला चांगला धडा मिळाला होता. त्यानंतर २०११ साली कोची टस्कर्स या संघाने जडेजाला आपल्या संघात स्थान दिले होते. पण त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने जडेजाला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. अजूनही जडेजा चेन्नईच्या संघाचा एक अविभाज्य भाग आहे. या आयपीएलमध्येही जडेजाने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. जडेजा भारतीय संघातही आहे आणि गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्याकडून चमकदार कामगिरी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी जडेजाला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे तो संघाबाहेर होता. पण आयपीएलमध्ये तो खेळताना दिसला. आता यापुढे भारतीय संघाकडून खेळताना जडेजाकडून कशी कामगिरी होते, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना नक्कीच असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here