‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील आपल्या रोखठोक या सदरात खासदार राऊत यांनी हे टीकेचे प्रहार केले आहेत. राऊत म्हणतात, ”मोदीजी, आमच्या मुलांची लस तुम्ही परदेशात का पाठवली?, अशी पोस्टर्स भिंतीवर टिकटवल्यानंतर रोजंदारीवर काम करणाऱ्या २५ गरीब मुलांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात डांबले. देशात लशीचा तुटवजा आहे व लसीकरण थांबले आहे. भारत हा सगळ्यात मोठा व्हॅक्सिन उत्पादक देश आहे. सरकारने १२ एप्रिलला लस उत्सव साजरा केला, पण लशीचा ठणठणाट होता. गेल्या ३० दिवसांमध्ये लसीकरणात ८० टक्के घसरण झाली. पंतप्रधान मोदी हे लस बनवणाऱ्या फॅक्टऱ्यांमध्ये जाऊन आले. त्याने काय साध्य झाले? अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी भारतातील लस उत्पादक कंपन्यांना आधीच मोठी ऑर्डर देऊन ठेवली होती. त्यामुळे भारतात बनलेली लस आधी मोठ्या प्रमाणात परदेशात पोहोचली व देशात प्रेतांचे खच पडले. मुदडे गंगेत तरंगत राहिले.’
‘पश्चिम बंगालमधील कारवाई राजकीय सूडबुद्धीने’
पश्चिम बंगालमध्ये सीबीआयचे लोक घुसले आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांची परवानगी नसताना दोन मंत्री आणि दोन आमदारांना अटक केली. या नारदा स्टिंग प्रकरणात भाजपचे सध्याचे प्रमुख नेते हातभर फसले आहेत. त्या लाचखोरीत सुवेन्दू अधिकारी या ‘पलटीरामाचे’ नाव आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. अधिकारी यांनी पाच लाख रुपये स्वीकारल्याचे चित्रफितीत दिसते. पण हे अधिकारी ममता बॅनर्जींना सोडून आल्यामुळे त्यांना अटक झाली नाही आणि यावर राज्यपाल धनकड मौन बाळगून असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
ज्या नारदा प्रकरणात तृणमूलच्या मंत्री व आमदारांना अटक केली त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले. मग सीबीआयने त्यांना अटक करण्याचे कारण काय?, असा सवाल उपस्थित करत याचा अर्थ स्पष्ट आहे की, हे प्रकरण राजकीय सूडबुद्धीनेच केले जात आहे, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times