मुंबई : ‘एक बूंद इश्क’ आणि ‘ नामकरण’ मालिकेतील कलाकार विराफ पटेलने त्याची गर्ल फ्रेंड सलोनी खन्नाशी ६ मे नोंदणी पद्धतीने लग्न केले. करोनामुळे देशात आणि राज्यात गंभीर परिस्थिती असल्याने अतिशय साधेपणाने या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यावेळी विराफने सलोनीच्या हातात रिंग ऐवजी रबरबँड घातला होता. अशा अनोख्या पद्धतीने या दोघांनी लग्न केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. परंतु आता या दोघांनी पुन्हा एकदा लग्नाची तयारी सुरू केली आहे. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की हे पुन्हा का लग्न करत आहेत. तर सलोनीच्या आयुष्यातील या खास व्यक्तीची नाराजी दूर करण्यासाठी हे दोघे पुन्हा लग्न करत आहेत.

विराफने सांगितले की, ‘ आम्ही दोघांनी वांद्रे कोर्टात जाऊन लग्न केल्यानंतर दुस-याच दिवशी सलोनीला तिच्या आजीने व्हिडीओ कॉल केला होता. त्यावेळी ती खूप रडत होती. तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही का रडत आहेत तेव्हा त्या म्हणाल्या की माझ्या नातीने तिच्या लग्नात रंगीत कपडे परिधान केले नव्हते. आमच्याकडे लग्नावेळी रंगीत कपडे परिधान करायचे असतात. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, आम्ही लग्नावेळी जे कपडे घातले होते ते तिच्याच पसंतीचे होते. तिला लग्न ऑफव्हाईट साडीवरच करायचे होते. त्याप्रमाणे आम्ही केले. मग त्यावर आजी रडत रडत म्हणाली, आमच्याकडे लग्नावेळी दागदागिने घालतात, रंगीत कपडे घालतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्यापैकी तुमच्या लग्नाला कुणीच नव्हते…असे म्हणून त्या रडू लागल्या. त्यावर मी त्यांना म्हणालो की, काही दिवस थांबा. सगळ काही सुरळीत झाले की आम्ही दोघे दिल्लीला येतो आणि तुम्ही जिथे सांगाल तिथे आणि तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आम्ही पुन्हा लग्न करू…’

विराफ पुढे म्हणाला, ‘सलोनीला पारंपरिक पद्धतीने लग्न करायचे नव्हते. तिला गपचूप लग्न करायचे होते, तशा पद्धतीने आम्ही लग्न केले आहे. परंतु आता तिच्या आजीचा रुसवा दूर करण्यासाठी सलोनी तिला हव्या त्या पद्धतीने लग्न करायला तयार झाली आहे. सलोनीने आजीचे म्हणणे मान्य केल्यामुळे आजीचा रुसवा काही प्रमाणात दूर झाला आहे. त्यामुळे आता जेव्हा सगळे काही सुरळीत होईल तेव्हा, मग ते या व्रषी किंवा पुढच्या वर्षी आम्ही आजी सांगतील त्याप्रमाणे लग्न करू…’

अचानक कसे लग्न केले?
विराफला यावेळी विचारले की, तुम्ही अचानक लग्न करण्याचे कसे ठरवले, त्यावर त्याने उत्तर दिले की, ‘ मी पारसी आहे आणि सलोनी पंजाबी. त्यामुळे आमचे हे लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गंत येत असल्याने कोर्टात एक महिना आधी लग्न करण्यासाठी अर्ज द्यावा लागतो. आमच्या या लग्नासाठी कुणाला हरकत घ्यायची असेल, तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो, आपल्या देशात तसा कायदा आहे. त्यामुळे एक-दीड महिन्यांपूर्वीच आम्ही आमच्या लग्नासाठीचा अर्ज दिला होता. एक महिना उलटल्यानंतर कुणीही आमच्या लग्नाला हरकत घेतली नाही. त्यामुळे आम्ही लगेचच लग्न करण्याचा विचार केला.’ विराफ पुढे म्हणाला, ‘आता हळूहळू मी देखील म्हातारा होऊ लागलो आहे. तेव्हा आपल्या वाडवडिलांनी सांगितले आहे की म्हातारपणासाठी लाठी हवी असेल तर लग्न करा…मग मलाही म्हातारपणासाठी काठी हवी होती म्हणून मी लग्न केले…’ असे हसतहसत सांगितले…

सलोनीने सांगितले की, ‘आम्ही दोघेहीजण एक वर्षापासून लग्न करण्यासाठी वाट बघत होतो. परंतु गेल्यावर्षी करोनामुळे संधी मिळाली नाही. त्यामुळे काही दिवसानंतर सर्व काही ठिक होईल या आशेवर आम्ही एक वर्ष थांबलो. परंतु परिस्थिती ठीक होत नव्हती. त्यामुळे अजून किती दिवस आपण थांबायचे…. असा विचार करून आम्ही कोर्टात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली. ‘

विराफ सलोनीची लव्हस्टोरी

विराफला त्याच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली असे विचारले असता तो म्हणाला, ‘ मी आणि सलोनी एकमेकांना २०१८ च्या अखेरीस पहिल्यांदा भेटले. त्यानंतर दोन-तीनवेळा आम्ही भेटलो. खरे तर पहिल्या भेटीत मला सलोनी आवडली होती. परंतु त्यानंतर जेव्हा भेटी झाल्या तेव्हा ती अधिकाधिक आवडू लागली होती. त्यानंतर ती मला आवडत असल्याचे तिला सांगितले. तेव्हा सलोनीने सांगितले की आपण अजून एकमेकांना जाणून घेऊ या. एकमेकांना पारखून घेऊ यात. त्यानंतर २०१९ मध्ये सलोनी स्वतःहून माझ्याकडे आली आणि म्हणाली आपण डिसेंबरमध्ये लग्न करू या. त्यानंतर आम्ही आपापल्या घरी सांगितले. त्यानंतर घरच्यांनी आम्हांला लग्नाच्या तयारीसाठी वेळ द्यायला सांगितले. त्यामध्ये दोन-तीन महिने गेले आणि मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागला. त्यामुळे लग्न करता आले नाही. सगळेच जण घरात बसून होते. त्यामुळे एक वर्ष पुन्हा थांबावे लागले. सलोनीला माझी परीक्षा घेण्यासाठी आणखी एक वर्ष मिळाले. त्यानंतर अखेरीस २०२१ मध्ये आम्ही जसे जमेल तसे लग्न करण्याचा निर्णय घेतला.’

सलोनीची कुठली गोष्ट आवडते असा प्रश्न विराफला विचारला असात त्याने सांगितले, ‘ सलोनी अतिशय साधेपणाने वागते. ती केवळ दिसायलाच सुंदर आहे असे नाही तर तिचे विचारही सुंदर आहेत. वागण्यात कुठेही बडेजाव नाही. लोकांचे म्हणणे ती ऐकून घेते. मी तिचे खूप निरीक्षण केले आहे. तिचे सर्वांशी वागणे बोलणे अतिशय छान आहे. समोरच्याला समून घेण्याची तिचा स्वभाव पाहून हिच ती.. अशीच व्यक्ती मला हवी आहे… असा निर्णय माझ्या मनाने दिला… ‘ तर सलोनीने सांगितले, ‘जेव्हा मी विराफसोबत असते तेव्हा मी अतिशय आनंदात असते. तो मला दुःखी होऊच देत नाही. त्याचे व्यक्तिमत्त्व सगळ्यांना आनंद देणारे आहे. त्याची हिच गोष्ट मला सर्वाधिक आवडते…’

एकमेकांची न आवडणारी गोष्ट कुठली आहे, असा प्रश्न त्यांना विचारला असता विराफने सांगितले, ‘ सलोनी जेव्हा घरात असते तेव्हा ती सगळ्या गोष्टींच्या जागा बदलून टाकते. मला मात्र माझ्या गोष्टी जागच्या जागी, घर अतिशय नीटनेटके लागते. परंतु तिला ते अजिबात मान्य नसते. बेडरूममधल्या उशा हॉलमध्ये असतात. हॉलमधल्या गोष्टी बेडरूमध्ये असतात. या सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेण्याचे काम सध्या लॉकडाऊन असल्याने मी करत आहे. त्यामुळे मी त्यात बिझी असतो…. ‘ तर सलोनीने सांगितले, ‘मला असे अनेकदा वाटते की आमच्या थोडेफार का होईना भांडण व्हावे, मग मी त्याच्यावर रागवावे…परंतु असे होत नाही कारण विराफ माझ्याशी कधीच भांडत नाही, त्याला कधीच राग येत नाही. मी भांडायचा खूप प्रयत्न करते परंतु विराफ अतिशय शांतपणे बोलत दुसरा विषय सुरू करतो आणि मी भांडायचे विसरून जाते. ‘

विराफच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याने कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूरच्या ‘कोई जाने ना’ मध्ये विक्की सिंघानिया ची भूमिका साकारली होती. तर लवकरच ऑल्ट बालाजीच्या ‘ब्रोकन बट ब्युटिफूल’ च्या तिस-या पर्वामध्ये दिसणार आहे. त्यात ती सोनिया राठीच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. तसेच झी ५ वरील ‘सनफ्लावर’ या आगामी वेबसीरिजमध्येही ती दिसणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here