: अकोला पोलिसांच्या () विशेष पथकानं दोन तडीपार आरोपींसह अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. अकोला जिल्ह्यातून तड़ीपार असलेल्या २ आरोपींना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तसंच जिल्ह्यात खुलेआम सुरु असलेल्या अवैध दारु विक्रेत्यांसह वरली अड्डयांवर कारवाई करून अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. दुसरीकडे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरही पथकानं कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान सुमारे ८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे पीएसआय स्वाती इथापे यांनी केली आहे.

अकोला जिल्ह्यातून तड़ीपार केलेल्या अर्थात तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २ गुन्हेगाराला पोलिसांनी गजाआड केले आहे.. शेख जुनेद शेख निजाम आणि संतोष उर्फ गोंडु सिताराम गुडधे असं या अटक केलेल्या गुन्हेगारांचं नाव आहे. यामधील एक आरोपी जुने शहरातील हमजा प्लांट तर दुसरा आरोपी गुडधे हा पातुर तालुक्यातील आगीखेड़ येथील रहिवासी आहे. तड़ीपार आदेशाचे उल्लंघन करून अकोला जिल्ह्यात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेख जुनेदला धारदार शस्त्रासह तर गूडधे याला पातुर येथून अटक केली आहे.

दरम्यान, एमएच 30 ई 1751 क्रमाकांच्या ट्रॅक्टरद्वारे अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर विशेष पथकानं अकोट फाईल परिसरातील ग्राम उगवा येथे सापळा रचला अन् या ठिकाणी कारवाई करून ट्रॅक्टर पकडला. तसंच या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले असून महादेव समाधान तायडे असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो उगवा येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून एक ब्रास रेतीसह एक ट्रॅक्टर असा एकत्रित ७ लाख ७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

अवैध दारु विक्रेत्यांसह वरली अड्डयांवरही पोलिसांच्या विशेष पथकानं धड़क कारवाई केली आहे. तब्बल पाच ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्या असून ग्राम कापशी तर अन्य जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्राम भांबेरी, मनब्दा व नेर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई झाली आहे. या कारवाई दरम्यान, आठ लोकांना ताब्यात घेण्यात आले असून सतिश मधुकर पवार, शरद भीमराव बोदडे, सुरेश बानाजी बोदडे, नितीन रामेश्वर उपराटे, बाबन बिंतुजी बोदडे, संदीप भिमराव तिडके, पंजाबराव साहेबराव तायडे, ईश्वर किसन बावणे असे त्यांची नावे आहे.

या आरोपींकडून जुगार साहित्यसह अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला असून या मुद्देमालाची एकत्रित किंमत १ लाखांच्या घरात आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ८ लाखांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे पीएसआय स्वाती इथापे यांनी ही कारवाई केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here