: करोनामुळे () देशात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या विषाणूमुळे सर्वसामान्य नागरिकांसह अनेक लोकप्रतिनिधींनाही आपला जीव गमवावा लागला. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल यांचं आज करोनामुळे निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. महमूद पटेल यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गेल्या महिन्यात २३ एप्रिलला महमूद पटेल आणि त्यांच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर सोलापूर शहरातील गंगामाई हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याचवेळी दुर्दैवाने आधीच करोना पॉझिटिव्ह असलेल्या त्यांच्या जावयाचे चार दिवसांनी म्हणजे २७ एप्रिलला निधन झाले. तसंच काही दिवसांपूर्वी म्हणजेच १७ मे रोजी त्यांच्या पत्नीचंही करोनामुळे निधन झाले आणि आज महमूद पटेल यांचीही करोनाविरोधातील झुंज अपयश ठरली.

शेतकऱ्यांसाठी महमूद पटेल यांचा लढा
महमूद पटेल हे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या लढ्यापासून शेतीशी निगडीत चळवळीत सामील झाले होते. गणेश रामचंद्र आपटे आणि महमूद पटेल यांनी सन १९९० पासून म्हणजे गेली ३० वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद केला होता. रस्त्यावर उतरुन आवाज उठविणारा शेतकऱ्यांचा नेता अशी महमूद पटेल यांची ओळख होती.

गेल्या १९ मार्चला वीज वितरण कंपनीच्या वीजतोड मोहिमेच्या विरोधात महमूद पटेल यांनी रास्तारोको करुन नंतर वीज वितरण कंपनी आणि शेतकरी असा सर्वमान्य वीज बिलाचा तोडगा काढला होता. ते त्यांचं शेवटचं आंदोलन ठरलं. त्यांच्या निधनामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात करोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेलं नाही. बहुतांश जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच सोलापूरसह कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here