पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे निलेश लंके यांच्या पुढाकारातून शरद पवार यांच्या नावाने कोविड केअर सेंटर चालवण्यात येत आहे. या सेंटरमध्ये लंके स्वत: मुक्काम ठोकून काम करत असल्याने आणि आयोजित केलेल्या अभिनव उपक्रमांमुळे याची राज्यभर चर्चा आहे. शनिवारी सायंकाळी जयंत पाटील यांनी या कोविड सेंटरला भेट दिली.
यावेळी बोलताना पाटील यांनी लंके यांच्या कामाचे कौतुक केले. पाटील म्हणाले, ‘हे काम पाहिल्यानंतर लंके यांचा अभिमान वाटत आहे. कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील माणसे दूर जात असताना लंके यांनी हजारो रुग्णांना जीवदान दिले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सच्चा माणूस म्हणून लंके समाजात काम करत आहेत. हजारे यांच्यानंतर त्यांनीच पारनेरचे नाव पुढे नेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने लंकेंच्या कार्याचा गौरव करतो. करोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. आगामी काळात येणाऱ्या संभाव्य लाटेसाठी सरकार सज्ज झाले. ऑक्सिजन व इतरही औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कोविड सेंटरसाठीही २५ लाख रुपयांची औषधे भेट दिली आहेत.’
‘शरद पवार यांनी महाराष्ट्राला आधार दिला’
जयंत पाटील यांनी कामाबाबत स्तुती केल्यानंतर आमदार निलेश लंके म्हणाले, ‘महाराष्ट्रावर ज्यावेळी संकट आले, त्यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्राला आधार दिला आहे. तोच वारसा पुढे नेत आम्ही काम करत आहोत. केवळ तालुक्यातीलच नव्हे तर परिसरातील रुग्णांवरही येथे उपचार करण्यात येत आहेत. लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढताना भयमुक्त वातावरणात उपचार देण्यावर आमचा भर आहे.’
दरम्यान, यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, अशोक घुले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी किशोर माने, डॉ बाळासाहेब कावरे, डॉ मानसी मानोरकर उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times