‘मुंबईचं गव्हर्नर ऑफिस हे भाजपचं कार्यालय झालं आहे. हे होता कामा नये, कारण राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. त्याला सगळ्यांचे कान ओढण्याचा अधिकार असतो. पण जेव्हा १२ व्यक्तींच्या नावाचा ठराव करून कॅबिनेट त्यांच्या नावाची यादी पाठवते तेव्हा त्या त्या क्षेत्राला प्राधान्य मिळावे, त्या क्षेत्राला न्याय मिळावा ही त्यातली भूमिका असते. काही चुकलं असेल तर त्यांनी शासनाला कळवावे. जे नियमात बसत नसेल तर त्यात शासन बदल करू शकतं. पण ते दाबून ठेवणं आणि त्या क्षेत्रातील प्रतिनिधीला संपवणं ही भूमिका चुकीची आहे. म्हणून राज्यपाल महोदयाना विनंती आहे की या सर्व प्रकरणावर पडदा पाडावा आणि विधानपरिषदेसाठी पाठवण्यात आलेल्या १२ जणांच्या नावाला मान्यता द्यावी,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले यांनी आज देवगड , मालवण, वेंगुर्ला येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तेव्हा ते बोलत होते.
मोदींवर तिरकस शब्दांत हल्ला
‘मोदींचं प्रेम महाराष्ट्रावर अधिकचे आहे. ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे गुजरातला १ हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला २ हजार कोटी मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे. डिजास्टर मॅनेजमेंट कायद्या २००५ च्या अंतर्गत संविधानिक अधिकार हे त्या त्या राज्याच्या जनतेचे आहेत. केंद्र सरकार मदत देणार म्हणजे उपकार करणार असं नाही. मोदींची महाराष्ट्रावर वक्रदृष्टी आहे की प्रेम याच अजून दर्शन झालेलं नाही. महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेलं आहे. हेलिकॉप्टरमधून गुजरातमध्ये फिरून १ हजार कोटी रुपये दिलेत, तसाच एक हवाई दौरा महाराष्ट्रात करून तातडीने २ हजार कोटी द्यावेत, ही नम्र विनंती मोदींना आहे,’ असं यावेळी नाना पटोले म्हणाले.
‘कोविडच्या काळात राज्य सरकार, केंद्र सरकार आणि खाजगी रुग्णालयात या सर्व ठिकाणी गडबड करण्यात आलेली आहे. व्हेंटिलेटरच्या नावाने प्रधानमंत्री केअर फंड जमा झालेला आहे. त्यातून जे व्हॅटिलेटर देण्यात आले ते नादुरुस्त आहेत. म्हणजे प्रधानमंत्र्याच्या कार्यालयातूनच भ्रष्टाचार सुरू झालेला असेल तर ते मुंबईतील KEM मध्ये हेच चाललेलं आहे. या करोना आजाराचा फायदा घेऊन सामान्य जनतेची लूट झालेली आहे, हे मान्य आहे. KEM मध्ये जो भ्रष्टाचार झालाय, त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येईल,’ अशी माहितीही नाना पटोले यांनी यावेळी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times