: करोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्राला हैराण केल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. तसंच वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे सर्वसामान्य नागरिकही हवालदिल झाले होते. मात्र आता दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. आजही राज्यात २९ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर नव्या २६ हजार ६७२ रुग्णांचं निदान झालं आहे.

राज्यात आज ५९४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ५१ लाख ४० हजार २७२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.१२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३०,१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,७९,८९७ (१६.९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २६,९६,३०६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात कालपर्यंत २ कोटी ०७ लाख ५२ हजार ८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.२२ मे रोजी १,२२,१४० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज नेमक्या काय सूचना दिल्या?
राज्यातील ६ हजार बाल रोग तज्ज्ञांना कोविडविषयक टास्क फोर्सने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी भाष्य केलं. ‘तिसरी लाट येईल का? आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल? याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलयं. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत करतो. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे, योग्य मार्गदर्शन करावे. कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या,’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here