म. टा. प्रतिनिधी, नगर: जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आरोग्य कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच वाहने लावण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करावी लागत असून तेथून चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनांना सुरक्षित जागा द्या, या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आंदोलन केले. करोनायोद्धे संबोधले जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आपल्या वाहनांच्या सुरक्षित पार्किंगसाठीच लढा देण्याची वेळ आली आहे.

सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले. पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन दिले. यापूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांचीही वाहने लावली जात. त्यासाठी आतमध्ये पार्किंगची सोयही आहे. उरलेली वाहने मोकळ्या जागेत लावली जात. मात्र, पाच मे पासून कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच आवारात वाहने आणण्यासाठी बंद करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी आतमध्ये उभ्या केलेल्या वाहनांचे चित्रिकरण केले. त्यांच्या नंबरवरून वाहनधारकांना दंडाचे चलान धाडण्यात आले. तेव्हापासून सर्वजण समोरील रस्त्यावर वाहने उभी करू लागले आहेत. मात्र, अलीकडेच शहरात वाहनांच्या चोऱ्या वाढल्या आहेत. रस्त्यावर उभी केलेली वाहने चोरी जात आहेत. त्यामुळ कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. यातूनच आज सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी करोना रुग्णांवरील उपचारात व्यस्त आहेत. संसर्गाच्या तणावाखाली त्यांना काम करावे लागत आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांची घरे दूर आहेत. सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्याने खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांना आपले वाहन घेऊन यावे लागते. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बंदी असल्याने त्यांना असुरक्षितपणे वाहन रस्त्यावरच उभे करावे लागत आहे. बाहेर वाहनाचे नुकसान अगर चोरी झाल्यास कोणाला जबाबदार धरण्यात यावे? आम्ही सर्व अधिकारी तथा कर्मचारी प्रशासनाला कायम सहकार्य करत आहोत. त्यामुळे प्रशासनानेही याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. यापूर्वी करण्यात आलेला दंड रद्द करण्यात यावा. वाहनांसाठी सुरक्षित जागा मिळावी आणि कर्मचाऱ्यांना तणावमुक्त काम करता यावे, असे वातावरण व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here