अमरावती : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष निवेदीता चौधरी यांनी रेमडेसिवीर गैरव्यवहारात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम व त्यांचा मुलगा सक्रीय असल्याचा आरोप केल्यानंतर आरोग्य यंत्रणेत रोष उफाळून आला आहे. यामुळे आता अमरावतीमध्ये रुग्णांचे हाल होण्याची वेळ आली आहे.

बिनबुडाचे आरोप करत सुटलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कधी आमच्या समस्या जाणून घेतल्या का? असा प्रतिप्रश्न करत जिल्हा कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’चा इशारा दिला आहे. जिल्हा कोविड रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही सुपर, डफरीन किंवा सुपर स्पेशालिटीत पोहोचून येथील अडी-अडचणी, कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाही. याउलट योग्यपद्धतीने काम करीत असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक तथा सुपरस्पेशालिटीचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यावर आधारहीन आरोप केले.

या आरोपामुळे आमचे पालक आम्हाला याठिकाणी काम करु नका, घरी परत या, असे म्हणत असल्याचे कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपने उगाच कुणावर आरोप करु नये. आरोप करायचेच असेल तर त्यासोबत पुरावेही सादर करावे, असे प्रति आव्हानसुद्धा यावेळी देण्यात आले.

डॉ निकम यांनी सतत कोविडमध्ये सेवा दिली. कोविड रुग्णांना धीर दिला. सतत कार्यरत राहून आम्हाला प्रोत्साहन दिले. मात्र, अशा आरोपामुळे आमच्या सर्व डॉक्टर्सची काम करण्याची इच्छाशक्ती कमी होत असल्याचे डॉ. रवी भूषण यांनी यावेळी सांगितले. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत सुपर, डफरीन, इर्विन रुग्णालयाची पाहणी केली का, कधी आमच्या समस्या जाणून घेतल्या का, मग असे बिनबुडाचे आरोप करण्याचे कारण काय, हे स्पष्ट करावे, असे अधिपरिचारिका वर्षा पागोटे यांचे म्हणणे होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here