‘उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना उपनगरामध्ये दाखवा आणि १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांनी मोफत लस मिळवा, अशी योजनाच मी स्वत: आणि मुंबई भाजपच्या वतीने आम्ही आणली आहे,’ असं म्हणत आमदार अतुल भातखळकर यांनी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.
‘वर्ष झालं पण उपनगराचे पालकमंत्री इथं दिसतच नाहीत. निसर्ग वादळ येऊन गेलं, त्यानंतर काही दिवसांपूर्वीही एक चक्रीवाळ येऊन गेलं. वर्सोवा, बोरिवली या भागातील मच्छीमारांचं नुकसान झालं, सर्वसामान्यांचं नुकसान झालं, लोकांचे रस्ते बंद झाले, पण आमचे पालकमंत्री प्रत्यक्ष दिसत नाहीत, फक्त ऑनलाईन दिसतात. आदित्य ठाकरे कुठे आहेत? त्यांनी किती कोविड सेंटर्सला भेटी दिल्या? ते घरात लपून बसले आहेत. म्हणूनच उपनगरात आदित्य ठाकरेंना दाखवा आणि लसीकरण मोफत मिळवा, ही योजना भाजपने लागू केली आहे,’ असंही अतुल भातखळकर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, २०२२ साली होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मुंबईत भाजप विरुद्ध असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजपने काही दिवसांपूर्वीच अतुल भातखळकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे भातखळकर यांनी आपला मोर्चा आता थेट ठाकरे कुटुंबाकडे वळवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून भाजपला कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times