राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आणि नंतर भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेने कोकणात राबविल्या जाणाऱ्या नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कोकणात नाणारच्या विरोधात प्रचार करून मतेही मिळवले होते. निवडणूक वचननाम्यातही नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याचं वचन शिवसेनेने दिलं होतं. मात्र आता राज्यात आघाडी सरकारमध्ये सामिल होताच शिवसेनेने नाणारवरून भूमिका बदलल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’त नाणार प्रकल्पाची भलामण करणारी जाहिरात आली आहे. या जाहिरातीत नाणार प्रकल्पामुळे कोकणाचा विकास होऊन कसा फायदा होणार हे सांगण्यात आलं आहे. कोकणात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक सुविधांबाबत या जाहिरातीत भाष्य करण्यात आलं आहे. हा प्रकल्प उभारल्यानंतर कोकणातील दीड लाख लोकांना रोजगार मिळणार असून २० हजार लोकांना थेट रोजगार मिळणार असल्याचं जाहिरातीत नमूद करण्यात आलं आहे. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल, कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच…’ ही टॅगलाइनही या जाहिरातीत देण्यात आली आहे. नाणार प्रकल्पाची पाठराखण करणाऱ्या या जाहिरातीमुळे कोकणवासियांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून शिवसेनेना फसवणूक करत असल्याची भावना कोकणवासियांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या जाहिरातीबाबत काय भूमिका मांडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या मुखपत्रात आलेल्या या जाहिरातीवर भाजपसह शिवसेनेचे आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times